नाशिक – सिन्नर तालुक्यातील शहा येथे प्रवीण कांदळकर (२७) या सराईत गुन्हेगाराची घरात शिरुन हत्या केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात १४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चार संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रवीण मागील दोन वर्षांपासून तडीपार होता. शुक्रवारी रात्री तो शहा या आपल्या गावी आला. शनिवारी सकाळी घराबाहेर काही फेकल्याचा आवाज आला. प्रवीणच्या आई-वडिलांनी बाहेर पाहिले असता गावातील सौरभ गोराणे, दिनेश गोराणे, वाळीबा गोराणे, शरद गोराणे, विजय गोराणे, सचिन बागल, राहुल बागल, अतुल गोराणे, आबा गोराणे, रवींद्र गोराणे, वैभव गोराणे, दगू साप्ते, गणेश सोनवणे, ,सर्जेराव गोराणे हे हातात कोयता, कुऱ्हाडी, सळई, दांडके घेऊन उभे होते. प्रवीण जास्त शहाणा झाला आहे. आम्हाला धमकी देतो. घरात आहे का, असे टोळक्याने दरडावले. प्रवीणचे वडील गोरक्षनाथ यांनी टोळक्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. प्रवीणची आई विजया यांनी आरडाओरड करत शेजाऱ्यांकडे मदत मागितली. परंतु, संशयितांच्या हातातील शस्त्रे पाहून कोणीही मदतीस आले नाही.
संशयितांनी प्रवीण याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. नंतर टोळके निघून गेले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण यास सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
प्रवीणवर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला असून या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे वावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. दिनेश गोराणे (२१), राहुल बागल (२९), अतुल गोराणे (२५) आणि आबा गोराणे या संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.