लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने ग्रामसेवकाला सुमारे १६ लाख रुपयांना फसवविण्यात आल्याचे जळगाव जिल्ह्यात उघडकीस आले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचारी आणि इतर संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश मेढे, योगेश शेळके आणि दिनेश भोई, असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पैकी योगेश शेळके याने प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांना बरोबर घेऊन ग्रामसेवकाकडून पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचे उघड झाले. ग्रामसेवक विकास पाटील यांची सचिन धुमाळ यांच्याशी आधीच मैत्री होती. धुमाळने ग्रामसेवक पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगत विश्वास संपादन केला.

आणखी वाचा-‘फडणवीस यांच्या आग्रहानंतरही पक्षाकडून दुर्लक्ष’

त्यानुसार सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक पाटील हे जळगाव रेल्वे स्थानकावर नीलेश अहिरे यास पैसे देण्यासाठी गेले. त्याचवेळी तीन पोलीस कर्मचारी तिथे आले. त्यांनी पैशांच्या बॅगसह नीलेश अहिरे यास ताब्यात घेतले. त्यामुळे धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की, पोलीस पैसे घेऊन गेले आहेत आणि आपल्याला आता काहीच करता येणार नाही. परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे थेट जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. त्यानंतर पोलीस चौकशीत सर्व प्रकार उघड झाला.

गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा पोलीस कर्मचारी होता. गुन्हा दाखल करून पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १६ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud by police on pretext of doubling money in jalgaon mrj