सात जणांविरुद्ध गुन्हा
धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी असणाऱ्या संस्थेचा क्रमांक स्वत:च्या फायद्यासाठी वापरून बेकायदा वस्तू विक्रीवाढ योजना सुरू करत अधिकृत संस्थेसह गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितात एक पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी आहे.
दिंडोरी तालुक्यातील वणीच्या श्री महारुद्र हनुमान सेवा समितीचा नोंदणी क्रमांक महारुद्र हनुमान सेवा समिती मल्टी सव्‍‌र्हिसेस या नावाने अधिकार नसताना वापरून भव्य सुलभ हप्ता वस्तू विक्रीवाढ योजना सुरू करण्यात आली. त्यात प्रकाश ऊर्फ मनोज थोरात, सोमनाथ ठुबे, शरद शिरसाठ, दीपक कापसे, विक्रम पैढारी यांनी पिंपळगाव कृषी बाजार समितीचा कर्मचारी आणि महारुद्र हनुमान सेवा समितीचा सचिव सतीश जाधवल यांच्या सांगण्यावरून ही योजना सुरू केली.
सुमारे सहा हजार सभासद आणि सहा हजार बक्षिसे असे या योजनेचे स्वरूप आहे. प्रत्येक सभासदाकडून ३५५० रुपये म्हणजेच हा एकूण आकडा दोन कोटीच्या पुढे जातो. वास्तविक, अधिकृत समितीला अशी योजना चालविण्याचा अधिकार घटनेत नाही. तर अनधिकृतरित्या नोंदणी क्रमांक वापरून अशी योजना सुरू केल्याने अधिकृत संस्थेचे पदाधिकारी अडचणीत सापडले. त्यांनी या विरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यानच्या काळात पदाधिकाऱ्यांना तक्रार मागे घ्यावी अन्यथा खंडणी वा इतर खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी संशयितांकडून देण्यात आली. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. सखोल चौकशीअंती संस्थेच्या नोंदणी क्रमांकाचा गैरवापर, गुंतवणूकदारांची फसवणूक, बनावटीकरण, संगनमताने कट रचणे या आरोपांवरून सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.