नाशिक: महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थेच्या काही शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नियमबाह्यपणे मान्यता देऊन संबंधितांच्या वेतनापोटी लाखो रुपयांचे वेतन काढून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी या संस्थांचे तत्कालीन संचालक तथा माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे डॉ. अपूर्व आणि अद्वय हिरे यांच्यासह विद्यमान संचालक, शिक्षक व लिपिकासह तत्कालीन शिक्षणाधिकारी अशा एकूण ९७ जणांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संदर्भात शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुंवर यांनी वेगवेगळ्या तक्रारी दिल्या. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित माध्यमिक शाळेत जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २०२३ या काळात हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळातील एकूण २५ पदाधिकारी व सदस्य तसेच तत्कालीन मुख्याध्यापक, २२ शिक्षक, १२ शिपाई, पाच लिपिक अशांनी संगनमत करून नियमबाह्यपणे जिल्हा परिषदेस मान्यतेचे प्रस्ताव पाठविले. तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील यांनी त्यास मान्यता देऊन फसवणूक केली.

हेही वाचा… जायकवाडीसंबंधी याचिकेवर मंगळवारी सुनावणी; पाणी न सोडण्याची मागणी

आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थेच्या माध्यमिक शाळेतील सात शिक्षक, एक लिपिक यांनी संस्थांच्या तत्कालीन संचालक मंडळातील २१ पदाधिकारी व सदस्य तसेच तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याशी संगनमताने प्रस्ताव पाठविले. तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी नियमबाह्य मान्यता दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही संस्था हिरे कुटुंबाशी संबंधित आहेत. अपूर्व हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर या संस्थेच्या कारभाराविरुध्द तक्रारींचा ओघ सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud case has been registered against 97 persons including former health minister pushpatai here former minister prashant hire in nashik dvr