नमस्कार मी.. तुमच्याकडे काही कामासाठी आले आहे.. मी स्थानिक रहिवासी असून विविध सरकारी योजनांची माहिती द्यायची आहे, थोडा वेळ आहे का ? असे संवाद कानी पडले तर हुरळून जाण्यापेक्षा दक्ष नागरिकांची भूमिका निभावणे गरजेचे आहे. शहर परिसरात सध्या ज्येष्ठ नागरिकांना पुढे करत बचत गट किंवा शासकीय योजनांच्या नावाखाली नागरिकांना गंडविण्यासाठी अशी शक्कल लढविली जात असल्याचे दिसत आहे. अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरात सोन साखळी लंपास करणे, घरफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरू असतांना घरात बसलेल्या नागरिकांना फसविण्यासाठी वेगळी पध्दती शोधून काढल्याचे दिसत आहे. ज्येष्ठांची ढाल पुढे करत या प्रकारांत एखादी टोळी सक्रिय आहे का, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. सिंहस्थाच्या धामधुमीचा फायदा घेत जेवणाचा डबा किंवा आखाडय़ाचा स्वयंपाक आदी कामे बचत गटांच्या माध्यमातून देतो असे सांगत अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यात महिलांकडून त्यांची कागदपत्रे ताब्यात घेत त्यांच्याच नावावर कर्ज काढून संशयितांनी पोबारा केल्याचे उघड झाले होते. आता संशयितांनी शासकीय योजनांचा आधार घेतल्याचे लक्षात येते.
दिवसा कोणत्याही वेळी घराची बेल वाजते आणि ज्येष्ठ नागरिक असलेली स्त्री किंवा पुरूष (वय वर्ष ६०-७० दरम्यान) घरात प्रवेश करते. घरा समोरील नावाची पाटी, दुकान किंवा अन्य काही व्यवसायाची माहिती घेत चौकशी करण्यासाठी ज्येष्ठांना पुढे केले जाते. तुमच्या घरात व्यक्ती किती, त्यांचे शिक्षण काय, ते काय करतात, एकंदरीत आर्थिक उत्पन्न काय, याचा अंदाज घेत पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, जनधन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना, गर्भवती महिलांना जननी शिशु सुरक्षा योजना किंवा जननी सुरक्षा योजना आदी योजनांची माहिती दिली जाते. विविध योजनांच्या माध्यमातून एक रूपया खर्च न करता कर्ज कसे काढता येऊ शकते, याची माहिती दिली जाते. यामध्ये नागरिकांच्या गरजा लक्षात घेत अगदी शिक्षणापासून ते मुलीच्या लग्नापर्यंत किंवा लघू उद्योगासाठी भाग भांडवल उभारण्यापर्यंत काय करता येईल याची खडानखडा माहिती देताना समोरच्यांचा अंदाज घेतला जातो. आपण लाभार्थी होऊ शकतो, हे समोरील व्यक्तीच्या पचनी पडले की, आधार कार्डची छायांकित प्रत, बँकेच्या काही कागदपत्रांची छायांकीत प्रत, छायाचित्र, धनादेश आदी साहित्यासह एक हजार रुपये तयार ठेवण्यास सांगितले जाते.
तुमचा प्रस्ताव तयार करून देतो किंवा देते असे सांगत दुसऱ्या दिवशी जमेल तसे ही फसवणूक सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. आर्थिक फसवणूक काही अंशी होत असली तरी वैयक्तीक तपशील या माध्यमातून सर्रास गोळा केला जात असल्याने त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.
सिडकोत असे काही प्रकार घडल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या पाश्र्वभूमीवर, नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा