ऊस तोडणीसाठी कामगार पुरविण्याच्या नावाखाली फसविल्याचे दोन प्रकार शिंदखेडा आणि शिरपूर येथे उघड झाले.याप्रकरणी वेगवेगळ्या दोन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. शिंदखेडा पोलीस ठाण्यात युवराज पाटील (ईटकरे,सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऊसतोड कामगार पुरवितो असे सांगून अनिल ठाकरे (रा.सोनशेलू, शिंदखेडा) याने पाटील यांच्याशी करार केला. चार लाख १० हजार रुपये घेतले.
हेही वाचा >>> यावलमध्ये फर्निचर दुकानांवर कारवाई; वन लाकूड जप्त
१५ एप्रिल २०१८ ते चार जुलै २०१८ आणि २०१८-२०१९ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोड आणि भरणी कामासाठी करारनामा झाला होता. या करारनाम्याच्या अनुषंगाने सर्व रक्कम बँक खात्यातून देण्यात आली होती. परंतु, ठरविल्याप्रमाणे ठाकरे याने कामगारही पाठविले नाही आणि पैसेही परत केले नाहीत. या तक्रारीवरुन शिंदखेडा पोलीस ठाण्यात ठाकरेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी तक्रार महावीर आदगौडा ( ऐतवडे, सांगली) यांनी दिली आहे. गरताड (ता. शिरपूर) येथील विश्वनाथ भिल याने वारणा सहकारी साखर कारखान्याचा ऊसतोड आणि वाहतुकीसाठी २४ मजूर पुरवितो, अशी नोटरी करून दिली. या कामासाठी आठ लाख ७५ हजार २६ रुपये घेतले. मजूर न पाठविता फसवणूक केली. शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भिलविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.