मित्राने अडचणीचा बहाणा करीत अल्पवयीन मैत्रिणीकडे आर्थिक मदत मागितल्यावर तिने कुणाच्या नकळत घरातील दोन लाखाची रोकड आणि लाखोंचे दागिने त्याच्या स्वाधीन केले. ही मदत तिला चांगलीच महागात पडली. संशयित मित्राकडून तिची फसवणूक झाली. घरातून रोकड आणि दागिने अचानक गायब झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा >>> नाशिक : पाणी पुरवठा योजना सुधारित आराखड्यासाठी सल्लागार नियुक्तीला स्थगिती

आकाश शिलावट (२२, नाशिकरोड) असे या संशयित मित्राचे नाव आहे. याबाबत अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. संशयित आणि १७ वर्षाची मुलगी एकमेकांचे मित्र आहेत. मागील महिन्यात त्यांची भेट झाली होती. तेव्हा संशयिताने अडचणीचे कारण देत पैश्यांची निकड असल्याचे सांगितले होते. मुलीने मित्राला मदत करण्याचे ठरवले. घरातील एक लाख, ९८ हजाराची रोकड आणि लाखोंचे १२२ ग्रॅम दागिने तिने त्याच्या स्वाधीन केले. काही दिवसात घरातील रोकड आणि दागिने गायब झाल्याने शोधाशोध सुरू झाली. पण ते सापडत नव्हते. अखेर पालकांनी पोलिसांत तक्रार देण्याची तयारी केली. तेव्हा मुलीकडे चौकशी केली असता या प्रकाराचा उलगडा झाला. पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मित्राने स्वत:च्या फायद्यासाठी रोकड, दागिने घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader