सहा महिन्यात गुंतवणूक दामदुप्पट, अलिशान मोटार आणि विदेशात यात्रा असे आमिष दाखवित शहरातील गुंतवणूकदारांची पुन्हा कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. एम फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉईन ५५ च्या नावावर तक्रारदारांच्या बँक खात्यांमधून आणि रोख स्वरुपात रक्कम स्वीकारली गेली. या संदर्भात आतापर्यंत २३ गुंतवणूकदार पुढे आले असून संशयितांनी त्यांच्याकडून साडेचार कोटींची रक्कम लुबाडली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> जळगाव : पाचोर्यानजीक टायर फुटल्याने टॅक्टर उलटून युवक जागीच ठार
या संदर्भात पवननगर येथील युवराज गायकवाड उर्फ युवराज पाटील यांनी तक्रार दिली. त्यानुसार मोहंमद हबीब मोहंमद हनीफ (गुलबर्गा, कर्नाटक) आणि मोहंमद अब्बास मोहंमद युसुफ या संशयितांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जिल्ह्यात केबीसी, मैत्रेयसह जादा परताव्याचे आमिष दाखवित अनेक योजनांमध्ये फसवणूक झाली आहे. त्याची या निमित्ताने नव्याने पुनरावृत्ती झाली. संशयितांनी तक्रारदार आणि त्याच्या मित्रांचा विश्वास संपादन केला. त्र्यंबक रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जानेवारी २०२१ मध्ये बैठक घेतली. नागरिकांना गुंतवणूक योजनेची माहिती दिली होती. सहा महिन्यात गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल. गुंतवणूकदारांना वेगवेगळे पारितोषिक मिळतील. इतकेच नव्हे तर, अलिशान मोटार व विदेशात यात्रेची संधी असल्याच्या भूलथापा दिल्या गेल्या. त्यास अनेक जण भुलले. कोणी पाच लाख तर, कोणी १० ते २० लाखांपर्यंतची रक्कम या योजनांमध्ये गुंतवली. संशयितांचे एम फॉरेक्स व क्रिप्टो करन्सीच्या नावाने वेबपोर्टल होते. त्यावर गुंतवणूक व तत्सम माहिती दिली जात असल्याचे सांगितले जाते. याच काळात संशयितांनी कॉर्बेट क्रिप्टो कॉईन ५५ आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी ॲपही विकसित केले. एम फॉरेक्स व कॉर्बेट क्रिप्टो कॉईनच्या नावाने गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांमधून आणि रोख स्वरुपात चार कोटी १८ हजारहून अधिक रक्कम घेण्यात आली. मुदत संपुष्टात आल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. संशयित गायब झाले. वेब पोर्टल, आर्थिक व्यवहाराचे ॲपही बंद झाले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली.
हेही वाचा >>> मनमाड उपजिल्हा रुग्णालयात जातीची विचारणा
जादा परताव्याचे आमिष दाखवित ही योजना साखळी पध्दतीने राबविली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ज्यांनी आधी गुंतवणूक केली, त्यांनी आपल्या आप्तमित्रांना त्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला. यामुळे गुंतवणुकीची रक्कम यापेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एम. पिसे हे करीत आहेत.
गुंतवणूकदारांना आवाहन
उपरोक्त प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अन्य कुणाची फसवणूक झालेली असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. एम. पिसे यांनी केले आहे.