लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: ऑनलाइन व्यापारात गुंतवणूक करून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवीत एकाला सुमारे साडेनऊ लाखांची फसवणूक करणार्या तरुणाला भावनगरमधून (गुजरात) सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे पाच लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. विजय दयाभाई कलसरिया ऊर्फ अजय (वय ३३, रा. अम्रेली, गुजरात) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रावेर येथील बागायतदार बर्हाटे यांना व्हॉटसअॅप व भ्रमणध्वनीवर संपर्क करीत ऑनलाइन व्यापारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा होईल, असे आमिष दाखविले. नंतर अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडत त्यांची नऊ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. १४ डिसेंबर २०२२ ते १ एप्रिल २०२३ दरम्यान त्यांच्याकडून रक्कम घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर बर्हाटे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा… मनमाड : मातेची बालिकेस मारहाण, समाजसेवकाच्या सतर्कतेमुळे सुटका
पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, संदीप साळवे, ईश्वर पाटील यांच्या पथकाने व्हॉट्सअॅपचे लघुसंदेश, संपर्क, ऑनलाइन ट्रेडिंग अॅप्लिकेशन, यासह बँकेतील माहितीच्या अनुषंगाने तपास केला. संशयित गुजरातमधील भावनगरातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचत विजय दयाभाई कलसरिया ऊर्फ अजय याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेतील पाच लाखांची रोकड हस्तगत केली.
हेही वाचा… ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी
दरम्यान, संशयित हा फसवणूक करणार्या टोळीतील सदस्य व मध्यस्थी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. टक्केवारी ठरवून आलेले पैसे तो बँकेतून काढत टोळीला देण्याचे काम करीत होता. पोलिसांनी फिर्यादीची रक्कम वर्ग झालेले संबंधित खाते बँकांच्या मदतीने गोठवले. त्यामुळे टोळीतील म्होरक्याने कलसरियाकडून पैसे घेणे थांबविले होते. त्यामुळे त्याच्याकडील शिल्लक पाच लाख त्याने काढून दिले. बँक खाते गोठविल्याने फिर्यादीचे एक लाख रुपये वाचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.