नाशिक – थंडीचा कडाका ११ दिवस सहन करुन सुमारे २५० किलोमीटरची पायपीट करीत नाशिकपर्यंत आलेल्या बिऱ्हाड मोर्चातील हजारो मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास मात्र सुखकारक झाला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारहून मुंबईला धडक देण्यासाठी निघालेला आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा सोमवारी नाशिकमध्ये स्थगित झाला.
मोर्चेकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी प्रशासनाने रातोरात राज्य परिवहन महामंडळाच्या ४५ बस उपलब्ध केल्या. नंदुरबार, धुळ्यासह एकूण नऊ ठिकाणी बससेवेव्दारे साडेतीन ते चार हजार मोर्चेकऱ्यांना मोफत आपापल्या घरी पोहोचविण्यात आले. दरम्यान, अतिशय कमी वेळेत मोर्चेकऱ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचे नियोजन केल्याबद्दल मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले.
हेही वाचा – नाशिक : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्कासह शेतीमालाला रास्तभाव, भूसंपादनास विरोध, गायरान हक्क आदी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबार ते मुंबई असा बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता. नंदुरबारहून आठ डिसेंबर रोजी निघालेला मोर्चा नाशिकजवळ आला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मोर्चाचे शिष्टमंडळ नागपूर येथे गेले होते. सोमवारी मोर्चा शहरात आल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले. हजारो मोर्चेकरी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाण मांडून होते. थंडीची तमा न बाळगता त्यांनी सुमारे २५० किलोमीटरचे अंतर पायी पार केले होते. मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मोर्चेकऱ्यांना आपापल्या घरी पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाने केली. त्यांच्यासाठी तातडीने बससेवेची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आले.
वेगवेगळ्या आगारातून एकूण ४५ बससेवेची व्यवस्था करण्यात आली. कोणत्या भागातील, किती मोर्चेकरी आहेत याची प्राथमिक माहिती घेऊन महामंडळाने नियोजन केले. त्याआधारे नंदुरबारसाठी १४, धुळ्यासाठी आठ, नवापूरसाठी पाच, पिंपळनेर तीन, साक्री दोन, दहिवेलसाठी तीन, खांडबारा पाच आणि निजामपूरसाठी चार अशा एकूण ४५ बस सोडण्यात आल्या.
हेही वाचा – मनमाडमध्ये नागरी सुविधांचा अभाव, ठाकरे गटाचे आंदोलन
या माध्यमातून साडेतीन हजारांहून अधिक मोर्चेकऱ्यांना सुखरुपपणे त्यांच्या घरी मार्गस्थ करण्यात आल्याचे राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. बसने घरी जाताना मोर्चेकऱ्यांकडून भाडे आकारणी झाली नाही. महामंडळाने उपलब्ध केलेल्या बसचे भाडे शासनाकडून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही मोर्चेकरी खासगी वाहनांतून रवाना झाले.