लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: जिल्ह्यातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवावर्गास स्पर्धा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, सरळसेवा परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे, जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढवा, हा या अभियानामागील हेतू आहे. जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, वनरक्षक, बँकिंग, रेल्वे, सैन्य भरती आदी सरळसेवा परीक्षांसह केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे.

आणखी वाचा-“आदिवासी पाडे रस्त्यांनी बारमाही जोडले जाणार”, साक्री तालुक्यातील मेळाव्यात डॉ. विजयकुमार गावित

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केली असून अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या किंवा यापुढे विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष अभियान हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नावनोंदणीला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी धुळे डॉट स्पर्धामिशन डॉट कॉम या लिंकवर नाव नोंदणी करावी. यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसेल.

धुळे जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आणि किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free competitive exam lessons for youth in dhule district concept of guardian minister girish mahajan mrj