शरद महाले यांच्याकडून ग्रामस्थांना दीड हजार लिटर पाण्याचे मोफत वितरण
अनिकेत साठे, नाशिक
दुष्काळात पाण्याची ‘किंमत’ कळते. तहानलेल्या भागात तेजीत आलेला पाण्याचा बाजार तेच दाखवतो. पाणी टंचाईचे संकट पाणी पुरविणाऱ्या काही जणांसाठी इष्टापती ठरले आहे. यातून ग्रामीण भागात पाणी विक्रीचा व्यवसाय जोमाने फोफावला असला तरी दुसरीकडे काही जण मात्र माणुसकीचे दर्शन घडवीत असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शरद महाले हे त्यापैकीच एक.
गाव परिसरातील सर्व विहिरी कोरडय़ा पडल्याने ते आपल्या विंधन विहिरीतून ग्रामस्थांना दररोज दीड ते दोन हजार लिटर पाणी मोफत पुरवीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांचे गाव आणि शेत यात दीड किलोमीटरचे अंतर आहे. स्वत:च्या ट्रॅक्टरवर टाक्या बांधून त्या भरून देण्याचे काम ते दोन महिन्यांपासून करीत असून पाणी वितरणाची पद्धत महिलांच्या डोईवरील भार हलका करणारी ठरली आहे.
त्र्यंबकेश्वरपासून १५ किलोमीटरवर वसलेल्या विनायकनगरची लोकसंख्या साधारणत: ५०० च्या आसपास. हे गाव गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट असून विनायकनगरमधील सर्व विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. कधीतरी पाण्याचा टँकर आणून विहिरीत ओतला जातो. त्यावर तीन-चार दिवसांचे भागते. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती. कपडे धुण्यासाठी महिलांना दीड किलोमीटरवर लांब विहिरीवर जावे लागते. काही जण त्यापेक्षा दूरवरून पाणी आणतात. परिसरात ज्या काही निवडक मंडळींकडे पाणी आहे, त्यांच्याकडून ते विकत घ्यावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
१५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होणारे मनमाड असो, किंवा विहिरींनी तळ गाठलेले अन्य कोणतेही छोटे-मोठे गाव. पाण्याचा धंदा सर्वत्र तेजीत आहे. टँकरला अंतर्निहाय पैसे मोजावे लागतात. बैलगाडीत प्लास्टिक टाकी भरून घेणे असो, की शुद्ध पाण्यासाठी जार विकत घेणे. सर्वासाठी पैसे मोजावे लागतात. पाण्यासाठीचा खर्च सर्वाना परवडणारा नाही.
आदिवासीबहुल गावातील कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताचीच. दुष्काळामुळे बहुतांश पुरुष नाशिक शहर, औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधात जातात. काम मिळाले तर दोन पैसे मिळणार, अन्यथा भाडय़ाचेही पैसे वाया जातात.
रोजंदारीवर मिळणाऱ्या कामांवर कुटुंबाची गुजराण होते. पाण्यासाठी पैसे खर्च करण्याची कित्येकांची ऐपत नाही. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही स्थिती लक्षात घेत शरद महाले यांनी जमेल तितक्या कुटुंबांची तहान भागविण्यासाठी धडपड चालविली आहे. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांचे शेत आहे. तेथील विंधन विहिरीतून सकाळ, सायंकाळी साधारणपणे प्रत्येकी अर्धा तास पाणी मिळते. महाले यांची विंधन विहीर ग्रामस्थांचा एकमेव आधार आहे. शिवाय, वितरणाच्या पद्धतीने रणरणत्या उन्हात महिलांचा डोक्यावरील भार हलका झाला आहे.
या पाणी वितरणाची पद्धत विलक्षण आहे. महाले यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टरला आसपासचे २५ ते ३० कुटुंबीय आपले नाव लिहिलेल्या रिकाम्या टाक्या बांधतात. दररोज हे ट्रॅक्टर घेऊन महाले शेतात जातात. ट्रॅक्टरवर बांधलेल्या टाक्या भरतात. स्वत:च्या घरासाठी पाणी भरतात. शेताच्या आसपास वास्तव्यास असणारे काही कुटुंबे त्यांच्या प्रतीक्षेत असतात. ट्रॅक्टर आले की, त्यांची पाणी भरून घेण्यासाठी धावपळ उडते. ट्रॅक्टर माघारी गावात आला की, महिला वर्ग आपापली टाकी घेऊन घरी जातात. दररोज साधारणत: १०० जणांच्या २५ ते ३० कुटुंबांना पिण्याचे पाणी मोफत देण्याचे काम ते करीत आहेत.