नाशिक – आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध असलेल्या शबरी आदिवासी विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महाबँक आरसेटी या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे आता शबरीच्या लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्ज योजना, पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प यांसह इतर योजनांमधील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. या सामंजस्य करारामुळे शबरीच्या प्रशिक्षणार्थींना आरसेटीचे बळ मिळणार आहे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा देखील राबविण्यात येत असतात. या कार्यशाळेमध्ये दस्तऐवजीकरण, लेखा, विपणन, समाज माध्यम यांचे प्रशिक्षण दिले जात असते. या सर्व लाभार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी महाबँक आरसेटीच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी मोफत प्रशिक्षण सत्र राबविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आदिवासी विकास आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आणि महाबँक आरसेटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी. बी. सिंग यांनी करारनामा हस्तांतरीत केला. यावेळी वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राम्हणकर, सल्लागार पंकज कुलकर्णी, दीपककुमार पाटील, शेषराव ससाणे, सचिन खाडे महाबँक आरसेटीचे संचालक जी.जी.सरोदे आदी उपस्थित होते.
महामंडळाच्या वतीने कर्ज योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे वितरण होत असतानाच त्या कर्जामधून आदिवासी बांधवांना व्यवसायामध्ये असलेल्या मूलभूत बाबींचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते. महामंडळाच्या वतीने वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळा राबवून त्यांना सक्षम केले जात असते. महाबँक आरसेटीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाच्या कर्ज योजना तसेच पथदर्शी दुग्ध प्रकल्प यांच्यासह सर्व लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. – लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)
शबरी महामंडळ आणि आरसेटीच्या सामंजस्य कराराचा फायदा नक्कीच आदिवासी बांधवांना होणार आहे. तसेच आदिवासी बांधवांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी योग्य प्रशिक्षण आरसेटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. – गणेश सरोदे (संचालक, महाबँक आरसेटी नाशिक)