संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी अभिनव उपक्रम
खुल्या नभांगणात भरारी घेणारे पक्षी सर्वानाच खुणावतात. पक्षीप्रेमींकडून अशा काही पक्ष्यांचे पालकत्व स्वीकारत त्यांना घरी सदस्य म्हणून स्वीकारलेही जाते. मात्र या पक्ष्यांचे पालनपोषण करताना त्यांची वैद्यकीयदृष्टया काळजी घेणारे मोजकेच आहे. यामुळे पक्ष्यांमध्ये काही संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे लक्षात घेत येथील नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेने २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आनंद अकाउन्टसी क्लास सभागृहात पक्ष्यांचे मोफत लसीकरण आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
शहर परिसरात तब्बल २० हजाराच्या आसपास पाळीव पक्षी आहेत. त्यात लव्हबर्डस, पोपटांच्या विदेशी जाती, फिंचेस, बदक, कोंबडीवर्गीय पक्ष्यांचा अधिक्याने समावेश आहे. हे पक्षी विदेशी असल्याने त्यांच्यावर भारतीय कायद्याचे नियम लागू होत नाही. आपले वन कायदे केवळ भारतीय पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आहेत.
पण गेल्या दोन-तीन वर्षांत पक्षीतज्ज्ञांच्या अभ्यासानुसार या पक्ष्यांची कोणतीही आरोग्य तपासणी, लसीकरण झालेले नाही. यामुळे पक्ष्यांचे आजार जे देशी पक्षी निसर्गात मुक्त फिरत आहेत, त्यांना होऊ लागले आहेत. ही बाब पक्षी संवर्धनासाठी घातक आहे. या पक्ष्यांमुळे राणीखेत, बर्ड फ्ल्यू, फाऊल फॉक्स, संसर्गजन्य आणि इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकमध्ये कबुतरांना मोठय़ा प्रमाणात राणीखेतची लागण झाल्याचे संस्थेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या पाश्र्वभूमीवर, नेचर क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेत प्रथमच पक्ष्यांचे मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिरात वन्य जीव कायद्यांतर्गत बंदी असलेले पक्षी सोडून इतर पाळीव पक्ष्यांची तपासणी होईल. तसेच, पाळीव पक्ष्यांचे आहार, वन्य जीव कायदा, पक्ष्यांची घ्यावयाची काळजी आदी विषयांवर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. जखमी पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन यावेळी किंग फिशर सभागृहात भरवले जाणार आहे. या कार्यक्रमात पक्षीमित्र, प्राणीमित्रांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी प्रकल्प संयोजक उमेश नागरे (७३८७४ ६६९९९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा