लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव: मालेगाव तालुक्यातील निंबायती येथे दरोडेखोरांचा प्रतिकार करताना एका दरोडेखोराची हत्या केल्याच्या आरोपातून एकूण १५ जणांची येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १२ वर्षांनी लागलेल्या या निकालाने शेतकरी कुटूंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

२०१० मध्ये मालेगाव व आसपासच्या तालुक्यांमध्ये दरोडयांचे सत्र सुरू होते. त्यामुळे शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. २२ जुलै २०१० च्या मध्यरात्री निंबायती शिवारात वास्तव्यास असलेल्या शिवाजी शेवाळे यांच्या घरावर पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सदस्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. तसेच तलवार, चाकू अशा प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवत स्त्रियांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडले. या हल्ल्यात शेवाळे हे स्वत:, त्यांचे वडील, भाऊ, पत्नी, मुलगी व बहिण असे सहाही जण जखमी झाले होते.

हेही वाचा… वाळू उपसाने शेती, गावे उद्ध्वस्त होण्याची भीती; गिरणा पात्रातील उपसाला ग्रामस्थांचा विरोध

दरोड्याच्या वेळी घरातील सदस्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने शिवारातील आसपासचे शेतकरी धावून आले होते. तेव्हा आपल्या दिशेने लोक येत असल्याचा अंदाज आल्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. परंतु पाचपैकी मच्छींद्र काळे या एका दरोडेखोरास पकडण्यात गावकऱ्यांना यश आले. यावेळी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण झाल्याने मच्छिंद्र याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी शेवाळे कुटूंबातील सहा सदस्यांसह अन्य नऊ गावकऱ्यांविरुध्द दरोडेखोराची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली होती.

हेही वाचा… प्लास्टिकचा वापर, अस्वच्छता करणाऱ्या २९ जणांवर कारवाई

या खटल्याची सुनावणी येथील अप्पर जिल्हा न्यायाधीश डी.डी.कुरुलकर यांच्या न्यायालयात पार पडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेवाळे व त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांनी दरोडेखोराचा प्रतिकार करणे शक्यच नाही. तसेच गावातील लोकांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या हल्ल्यात दरोडेखोर ठार झाला असा युक्तीवाद संशयितांतर्फे ॲड.सुधीर अक्कर यांनी मांडला. न्यायालयाने तो मान्य करत सर्व संशयितांची मुक्तता केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom of a farmers family from the accusation of killing a robber in malegaon dvr
Show comments