मैत्रीचे अनेक किस्से चित्रपटांपासून पुस्तकांपर्यंत सर्वत्र वाचायला, बघायला मिळतात. परंतु नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचे अनोखे उदाहरण नुकतेच समोर आले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रूपेश हरिश्चंद्र नाठे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे आणि त्यांच्या कुटुंबाने थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट स्वरुपात दिली आहे.
जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेले रूपेश नाठे यांनी गोंदे येथून महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवरायांची पालखी सुरू केली. विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग बघून त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून ही अनोखी भेट दिल्याचं त्यांचे मित्र डॉ. मुधळे व कुटुंबाने सांगितलं.
रूपेश नाठे यांना थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट स्वरुपात मिळाल्याची सध्या नाशिकसह महाराष्ट्रात चांगलीच चर्चा आहे. यापूर्वी बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याने चंद्रावर जागा खरेदी केली होती. परंतु, मित्राला वाढदिवसाला थेट चंद्रावर जमीन भेट दिल्याची बहुदा ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते. १ एकर जमीन खरेदीची रितसर नोंद इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी येथे झाल्याचे नाठे यांनी सांगितले. या नोंदणीच्या कागदपत्रांसोबतच जागेचा नकाशा व बोर्डीग पासदेखील त्यांना देण्यात आला आहे.