लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे. पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्यांमुळे काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेकडे (शिंदे गट) तुल्यबळ उमेदवार असू शकतात. अशा प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतील, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
भाजपच्या संघटनपर्व अभियानातंर्गत शनिवारी येथे विभागीय कार्यशाळा पार पडली. यावेळी मनसे, शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) काही माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गटातही अशाप्रकारे माजी नगरसेवकांचे प्रवेश होत असून अनेक ठिकाणी भाजप-शिंदे गट समोरासमोर उभे ठाकण्याची स्थिती आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी अशा काही प्रभागांमध्ये महायुतीतील नेते काय करायला हवे याचा विचार करतील. स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन मैत्रीपूर्ण लढती होतील, असे नमूद केले.
लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आम्ही फोडला नसल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र आणि राज्यात सरकार असल्याने पदाधिकारी नागरिकांना न्याय देण्यासाठी पक्षात येतात. विदर्भ व मराठवाड्यात काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येत असून राज्यात काँग्रेस हा सर्वात कमकुवत पक्ष झाल्याची टीका बावनकुळे यांनी केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत अद्याप एकमत झाली नसल्याची कबुली त्यांनी अप्रत्यक्षपणे दिली. पुढील १० ते १२ दिवसात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून सामंजस्याने निर्णय घेतील. एकमत होणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले.