लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शहरातून दरवर्षी शेकडो मुस्लीम बांधव हज यात्रेला जातात. हज यात्रेपूर्वी त्यांना अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. या सोबत त्यांची वैद्यकीय तपासणी व लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना हज यात्रेची परवानगी मिळते. यंदाही शहरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना करोना प्रतिबंधक लसीचे दोन मात्रा पूर्ण झाल्या असतील त्यांना महानगरपालिकेतर्फे दोन प्रकारच्या लसी दिल्या जाणार आहेत. त्यासाठी २३ व २४ मे या कालावधीत विशेष लसीकरण सत्र व वैद्यकीय तपासणीची सुविधा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात करण्यात आली आहे.
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असतील, त्यांना दोन प्रकारच्या लसी दिल्या जाणार आहे. आरोग्य तपासणी करून मेंदुज्वर व तोंडावाटे पोलिओची लस दिली जात आहे. तसेच ६५ वर्षांवरील हज यात्रेकरूंना इन्फ्लूएंझा लस दिली जात आहे. ज्यांना गंभीर आजार आहे, त्यांना ही लस दिली जाईल. या शिवाय रक्तदाब, साखरेचे प्रमाण, तंदुरुस्ती बाबत संपूर्ण आरोग्य तपासणी केली जात आहे.
हेही वाचा… नाशिक: कुठे उकाडा, कुठे अवकाळी; जिल्ह्यात संमिश्र वातावरण
मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे विशेष लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. शहरातील ज्या नागरिकांना हज यात्रेकरीता जायचे आहे, त्यांनी मंगळवार व बुधवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात संपर्क साधून लसीकरण व वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.