शिवकार्य गडकोट मोहिमेचे आंदोलन
गड-किल्ल्यांचे सर्वेक्षण करून संवर्धन कामासाठी तातडीने निधी मंजूर करावा, किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात आधी झालेल्या खर्चाची चौकशी करावी या मागण्यांसाठी मंगळवारी शिवकार्य गडकोट मोहीम व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले हे शासकीय, प्रशासकीय आणि सामाजिक उदासीनतेमुळे दुर्लक्षित झाले आहेत. काही ठिकाणी किल्ल्यांचे बुरूज कोसळत आहे. तटबंदी जमीनदोस्त होत आहे. जल व्यवस्थापनाच्या तळी बुजल्या आहेत. ऐतिहासिक संपदा नष्ट होत असतांना प्रशासन त्याकडे कानाडोळा करते. शिवरायांच्या स्मारकासोबत त्यांच्या किल्ल्यांचे जतन होणे काळाची गरज आहे. यासाठी किल्ल्यांचे सर्वेक्षण करत त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याकडे शिवकार्य आणि सह्य़ाद्री प्रतिष्ठानने लक्ष वेधले. किल्ल्यांच्या संवर्धन कामात सिमेंटऐवजी अतिटिकाऊ चुन्याचा वापर करावा, जिल्ह्यातील रामशेज, हातगड किल्ल्यांच्या कामात झालेल्या खर्चाची चौकशी करावी, तीर्थक्षेत्र विकास निधी, पर्यटन निधी, वन विभागाचा निधी, खासदार, आमदार निधी व अन्य निधीतून झालेल्या कामांची पाहणी करावी, किल्ल्यांवर प्राचीन वास्तूंची माहिती देणाऱ्या फलकांसह दिशादर्शक फलक लावावे, ओसाड किल्ल्यांवर झाडे लावण्यात यावी, त्यासाठी किल्ल्यावरील जलाशयातून पाण्याची व्यवस्था करावी या मागण्या आंदोलकांनी मांडल्या. या कामी वन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असून रोजगार हमी योजनेतून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा, खाचरे बनवून घ्यावे. तसेच, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली किल्ल्यांवर न्याव्यात, गड किल्ल्यांच्या परिसरात मद्यपींचा वावर पाहता किल्ल्याच्या सभोवताली १० किलोमीटर अंतरावर कोणतेही दारूधंदे नसावेत, तसे परवाना असल्यास ते तातडीने रद्द करावे, किल्ल्यांची कामे करण्याआधी स्थानिक दुर्गसंवर्धन मोहिमेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुरातत्व, पर्यटन, वन विभागाच्या संयुक्त समितीने किल्ल्यांचे सर्वेक्षण करावे, किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातील नागरिकांची किल्ला सुरक्षा दल स्थापन करत संवर्धनाच्या कामात स्थानिकांना रोजगार निधी उपलब्ध करून द्यावा या मागण्या राम खुर्दळ, अजिंक्य महाले, योगेश कापसे यांनी केल्या. यावेळी आनंद बोरा, कृष्णा भोर, हंसराज वडघुले पाटील, ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा