नाशिक – गणरायाला निरोप देण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीरा म्हणजे दुपारी १२ वाजता उत्साहात सुरुवात झाली. मिरवणुकीत मानाच्या मंडळासह २० पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग  आहे. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते. परंतु, १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गणेश विसर्जनासाठी नाशिक मनपा सज्ज; ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन व्यवस्था

वाकडी बारव येथे पालकमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे, महानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेट्ये, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाचे विनायक पांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गजानन शेलार आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे यांनी यावेळी स्वत: ढोलवादनाचा आनंद घेतला. उदघाटनानंतर मिरवणूक हळूहळू पुढे सरकू लागली. प्रत्येक मंडळाला थांबण्याची काही ठिकाणे दिली असून वादनासाठी वेळ दिला आहे. दादासाहेब फाळके मार्ग -महात्मा फुले मार्केट- दूधबाजार चौक- बादशाही लॉज कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड- धुमाळ पॉइंट- सांगली बँक सिग्नल-महात्मा गांधी रोड- मेहर सिग्नल-अशोकस्तंभ- नवीन तांबट गल्ली- रविवार कारंजा-होळकर पूल-मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा-मालविय चौक- परशुराम पुरियामार्ग- कपालेश्वर मंदिर-भाजी बाजार-म्हसोबा पटांगण हा मिरवणुकीचा मार्ग आहे. मिरवणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत  मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर – बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस

मिरवणुकीत गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणेश मंडळासमोरील लेझीम पथकाने नेहमीप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधून गेले. यंदाच्या मिरवणुकीत ढोलताशा मंडळांचा सहभाग अधिक आहे. मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे. सायंकाळनंतर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. नियोजनानुसार शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगाघाटावर विसर्जनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion procession begins with enthusiasm in nashik zws