लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यांच्याकडून २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हैदराबाद येथील कन्हय्यालाल सुगंधी हे कुटूंबासह हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेसने बऱ्हाणपूरसाठी (मध्य प्रदेश) प्रवास करत होते. प्रवासात ते झोपले असतांना नगरसूल ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये सात हजार रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे असा २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता. सुगंधी यांनी जळगांव लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर तेथील लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी यांनी तपास सुरू केला.

हैदराबाद एक्स्प्रेसमध्ये चोरी केल्यानंतर संशयित चार महिला मनमाड रेल्वे स्थानकात उतरल्या. नंतर त्या दादर-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये बसल्या. पोलीस आणि सुरक्षारक्षक त्यांच्या मागावर होते. सुरक्षा दलाच्या पथकाने धावत्या गाडीत या महिलांना बरोबर हेरले. कारण त्या मनमाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांनी रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले. गौरी महाजन-काळे (१९, वालवड, भूम), रेश्मा भोसले (१९, कऱ्हेटाकळी, अहिल्यानगर), पूजा काळे (१९) आणि अजून एक यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली सुटकेस ताब्यात घेतली.

Story img Loader