लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: विहितगाव येथील वाहनांची जाळपोळ व तोडफोडीच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी रात्री नाशिकरोडच्या दत्त मंदिर रस्त्यावर टोळक्याने तलवारी व कोयत्याने पुन्हा काही वाहनांची तोडफोड करीत धुडगूस घातल्याचे समोर आले आहे. दुचाकीवरील टोळक्याचा स्थानिक युवकांनी पाठलाग केला. परंतु, संशयित हाती लागले नाहीत. या घटनाक्रमाने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विहितगाव परिसरात रविवारी रात्री समाजकंटकांनी एका इमारतीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ व तोडफोड करीत धुमाकूळ घातला होता. रस्त्यावर उभी असणारी चारचाकी वाहनेही कोयता, दगडांनी फोडत त्यांनी दहशत पसरवली. यात जवळपास १५ वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत दोघांनाअटक केली. या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच नाशिकरोडच्या मुक्तीधाम परिसरात पुन्हा तसाच प्रकार घडला.

आणखी वाचा-१५ दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा घेतला भयंकर बदला, नाशिकमध्ये तरुणाचा पाठलाग करत खून

रात्री १२ वाजता दुचाकींवर नऊ जणांचे टोळके कोयते व तलवारी घेऊन दत्त मंदिर रस्त्यावर आले. राजलक्ष्नी सभागृह परिसर व जगताप मळा भागातील चार, पाच वाहनांच्या काचा फोडून ते पळून गेले. संशयितांनी चेहेऱ्यावर रुमाल बांधलेला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी चौकात धाव घेतली. पोलीसही दाखल झाले. आसपासच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात आली. त्याचवेळी संशयित टोळके पुन्हा या भागात आल्याचे दृष्टीपथास पडल्यानंतर सर्वांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. खोले मळा, रोकडोबा वाडी, तोफखाना रस्त्याने दुचाकीवर पळालेले टोळके नंतर गायब झाले. या बाबतची माहिती संशयितांचा पाठलाग करणारे शिवसैनिक अतुल धोंगडे यांनी दिली.

दरम्यान, नाशिकरोड परिसरात दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांनी स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विहितगावच्या घटनेनंतर या परिमंडळाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang riot again in nashik road mrj
Show comments