लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: विहितगाव येथील वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनेला चोवीस तासही उलटत नाही तोच सोमवारी रात्री नाशिकरोडच्या दत्त मंदिर रस्त्यावर टोळक्याने एकाची लुटमार केली. तलवार आणि कोयत्याने अनेक वाहनांची तोडफोड करीत धुडगूस घातला. दुचाकीवरील टोळक्याचा स्थानिकांनी पाठलाग केला. परंतु, संशयित पसार झाले. मंगळवारी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवित चौघांना ताब्यात घेतले. नागरिकांमधील भीतीचे सावट दूर करण्यासाठी टोळक्याची वरात काढण्यात आली. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी वेळप्रसंगी मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

विहितगाव परिसरात सोमवारी पहाटे समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ व तोडफोड करीत धुमाकूळ घातला होता. यात जवळपास १५ वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटकही केली. या घटनेला चोवीस तास उलटण्यापूर्वीच नाशिकरोडच्या मुक्तीधाम परिसरात पुन्हा तसाच प्रकार घडला. सोमवारी रात्री १२ वाजता दुचाकींवर आठ ते नऊ जणांचे टोळके कोयते घेऊन धोंगडे मळा परिसरात आले. या ठिकाणी घरासमोर आपले वाहन उभे करणाऱ्या जयंतीलाल मांगरोलिया (७०) यांना टोळक्याने मारहाण करीत त्यांच्या खिशातून २२०० रुपये काढून घेतले. यावेळी एकाने केलेला वार चुकवून मांगरोलिया कसेबसे पळून गेले. बाहेरील गोंधळ ऐकून आसपासचे नागरिक बाहेर आले. तेव्हा टोळक्याने धारदार शस्त्राने धमकावित घराबाहेर उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. संशयितांनी राजलक्ष्मी सभागृह, जगताप मळा भागात उभी असणारी पाच वाहने फोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी धाव घेतली. पोलीसही दाखल झाले. सर्वांनी टोळक्याचा पाठलाग केला. खोले मळा, रोकडोबा वाडी, तोफखाना केंद्र रस्त्याने दुचाकीवर पळालेले टोळके नंतर गायब झाले. या बाबतची माहिती संशयितांचा पाठलाग करणारे शिवसैनिक अतुल धोंगडे यांनी दिली.

आणखी वाचा-रस्त्याअभावी अडीच किलोमीटर डोलीप्रवास केलेल्या गर्भवतीचा मृत्यू; इगतपुरीतील आदिवासी पाडय़ातील हृदयद्रावक घटना

नाशिकरोड परिसरात दोन दिवसांत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विहितगावच्या घटनेनंतर या परिमंडळाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. उपरोक्त घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. भगूरच्या दारणा नदीकाठालगत लपून बसलेल्या शुभम बहेनवाल उर्फ बाशी, रोशन उर्फ नेम्या पवार, बहेनवाल आणि जावेद शेख (सर्व रा. रोकडोबावाडी आणि फर्नांडिस वाडी) यांना पथकाने ताब्यात घेतले. वाहन तोडफोड प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत. अंमली पदार्थांचे सेवन करून त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

आणखी वाचा-नाशिक: निफाड तालुक्यात युरियाचा काळाबाजार ; २० लाखाचा मुद्देमाल जप्त

शोध मोहीम राबवा, गस्त वाढवा

सलग दोन दिवस शहरात तोडफोड तसेच गाड्या जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. ही अराजकता खपवून घेतली जाणार नाही. संशयितांवर कठोर कारवाई करावी. वेळप्रसंगी मोक्कांतर्गत कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. अशा घटनांमध्ये कारवाईत कुठलीही तमा बाळगली जाणार नाही. मग संशयित कुठल्याही पक्षाचा असो, त्याला शासन नक्की होईल. पोलिसांना गुन्हेगार शोध मोहीम (मोहीम कोम्बिंग ऑपरेशन) तसेच गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-मंगळागौरीच्या तयारीला वेग; बाईपण भारी देवाचा प्रभाव

पोलीस अधिकाऱ्याशी संबंधित वाहनाचीही तोडफोड

दुचाकीवर आलेल्या टोळक्याने रात्री कोयते व तलवारीने धोंगडे मळा परिसरात दहशत माजविली. घराबाहेर उभ्या असणाऱ्या वॅगन आर, स्विफ्ट, महिंद्रा थार, फिगो अशा पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. याच ठिकाणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरील महिंद्रा थारच्या काचा फोडण्यात आल्या. कड यांच्या कुटुंबियांचे हे वाहन असल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang vandalizing vehicles in nashik road is arrested mrj
Show comments