नाशिक : सिडको येथील महाकाली चौक परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या एका युवकाला मागील भांडणाची कुरापत काढत काही युवकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री झालेल्या या प्रकारात हल्लाची चाहुल लागताच युवकाने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अंबड पोलीसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधार फरार आहे.
या प्रसंगी गुंडापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पीडीत युवकाने जवळील एका घराचा आसरा घेतला होता. दरम्यान, २५ ते ३० जणांच्या या टोळक्याने त्याचा माग काढत ते घर गाठले. यावेळी त्या घरातील माणसाने त्यांना मज्जाव करत पिटाळून लावल्याने पुढील अनर्थ टळला. एखाद्या चित्रपटातील वाटावा असा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हेही वाचा : नवीन पोलीस ठाण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा ; सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय
या प्रकरणी आठ संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मोईन आरीफ मनियार १९ रा. विजयनगर, प्रसाद आहेर १९ रा. दत्त चौक, शुभम-शिवम आहिरे २३ रा. ठाकरे सभागृह मागे, अमोल पाटील रा. कामठवाडा, राज शिंपी १९ रा. पेलीकन पार्क, मधुर उघाडे १८ रा. महाकाली चौक यासह एका अल्पवयीनाचा समावेश आहे. मुख्य सुत्रधार अजय परदेशी २४ रा. कामठवाडा फरार असून पोलीस शोध घेत आहे. सोमवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.
नवरात्र उत्सवाचा या घटनेशी काही संबध नसून दोन्ही गटात वाद होते. त्यातून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. – भागीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे</p>