धुळे : भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात उघडकीस आणला. दोन ठिकाणी छापे घालून एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून भिवखेड पाडा, बभळाज शिवारात वन जमिनीवर गांजाची बेकायदेशीर लागवड झाल्याची खात्री करण्यात आली. यानंतर सहायक निरीक्षक दीपक पावरा यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठविण्यात आले. महसूल विभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार महेश साळुंखे यांच्यासह रवाना झालेल्या या पथकाने मुसा  पावरा (रा. महादेव, शिरपूर) याच्या शेतात तपासणी केली. मुसाने भुईमूग आणि तूरीच्या शेतात गांजासदृश्य वनस्पतीची लागवड केलेली आढळली. या छाप्यात ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपयांची १४२८.३९० किलोग्रॅम वजनाची झाडे पथकाने जप्त केली.

हेही वाचा >>> जळगावात महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना जाळ्यात

या प्रकरणी शामसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुसाविरूद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून हिसाळे येथील देवसिंग पावरा याच्या गोरक्षनाथ पाडा शिवारातील शेतात तपासणी करण्यात आली. तूर आणि कापूस पिकांत गांजाची लागवड केल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह पथकाने ५६ लाख, आठ हजार ७५० रुपयांची एक हजार ६०२  किलो गांजाची तीन ते सहा फुट उंचीची झाडे जप्त केली. याप्रकरणी देवसिंगविरूद्ध महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganja cultivation among other crops in shirpur taluka goods worth over one crore seized ysh
Show comments