लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव – चोपडा तालुक्यातील शेतात तुरीच्या पिकांत चक्क गांजा लागवड केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी छाप्यात सुमारे ३१ लाख ८० हजारांचा ७९५ किलो ओला गांजा हस्तगत केला असून, संशयित पळून गेला. त्याच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चोपडा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उपअधीक्षक सुनील नंदवालकर आणि चोपडा येथील निरीक्षक कावेरी कमलाकर यांना चोपडा तालुक्यातील उत्तमनगर येथील रहिवासी रवी पावरा (२५) याच्या तुरीच्या शेतात गांजाची शेती केल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने उपअधीक्षक नंदवालकर, निरीक्षक कमलाकर, सहायक फौजदार देविदास ईशी, हवालदार राकेश पाटील, किरण पाटील, रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल जाधव, दिलीप पाटील आदींच्या पथकाने छापा टाकला. तुरीच्या शेतात आंतरपीक असलेल्या ओल्या गांजाची झाडे कापून सुमारे १० क्विंटल अर्थात दोन ट्रॅक्टरभर ओला गांजा जमा केला. त्याची किंमत प्रतिकिलो चार हजाराप्रमाणे सुमारे ३१ लाख ८० हजार रुपये आहे. नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी पंचनामा केला. सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे उपस्थित होते. मुख्य संशयित रवी पावरा पळून गेला. त्याचा अल्पवयीन भाऊ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
आणखी वाचा-श्री शिवपुराण कथा सोहळ्याचा समारोप, रहिवासी आणि पोलिसांचा जीव भांड्यात
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एरंडोल तालक्यातील खडकेसिम येथे एरंडोल- कासोदा रस्त्यालगत अंजनी धरणाच्या जलसाठा परिसरात सुमारे १० एकर क्षेत्रात आजूबाजूला तूर आणि मका या पिकांत मध्यभागी गांजाची शेती करण्यात आली होती. आता जिल्ह्यातील शेतकरी छुप्या पद्धतीने गांजा लागवडीकडे वळले असल्याचे चोपडा तालुक्यातील कारवाईतून सिद्ध होत आहे.