धुळे – तालुक्यातील वेल्हाणे (कुंडाणे) शिवारातील एका शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये गांजा शेती केली जात असल्याचे उघड झाले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून दोन लाख २० हजार १०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी कुंडाणे येथील संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, धुळे जिल्ह्यातील घटना
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचे पथक कुंडाणेतील परशुराम ठाकरे हा कसत असलेल्या शेतात पोहोचले. या ठिकाणी शेतालगत असलेल्या नाल्यात गांजाची बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली. झाडांचे वजन ५५ किलो, ५५ ग्रॅम असून प्रतिकिलो साधारणपणे चार हजार रुपये किंमत असल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. ठाकरेविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमली पदार्थ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडतील, त्या ठाण्याच्या निरीक्षकावर कारवाई करण्याच्या लेखी सूचना आपण यापूर्वीच दिल्या असून परिक्षेत्रात कुठेही अमली पदार्थांची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिला आहे.