नाशिक – सिडोकतील उत्तम नगर परिसरात एका घरात स्फोट होऊन तीन जण जखमी झाले होते. भ्रमणध्वनीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त झाला होता. तथापि, गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उत्तमनगरच्या सर्वेश्वर महादेव चौकातील एका घरात स्फोट झाला होता. त्यात घरातील तुषार जगताप (३४), त्यांची आई शोभा जगताप (६५), सासरे बाळकृष्ण सुतार (६८) हे तिघे भाजले होते. घरातील वस्तू , भ्रमणध्वनी, खिडक्या फुटून बाहेर फेकले गेले. स्फोट इतका भीषण होता की, १५ ते २० फूट अंतरावरील वाहनांच्या काचाही फुटल्या होत्या. यावेळी भ्रमणध्वनीचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त झाला होता. तपासाअंती गॅस गळती हे स्फोटाचे कारण असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा – लासलगाव बाजारात सकाळीच ४०० वाहने दाखल, नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावास सुरुवात
शोभा जगताप यांनी अंघोळीचे पाणी तापवायला गॅसचे बटन सुरू केले होते. मात्र गॅस न पेटल्यामुळे त्यांनी माचीस शोधायला सुरवात केली. यावेळी गॅसचे बटन सुरूच होते. शोभा यांना माचीस सापडल्यानंतर त्यांनी काडी पेटवली असता घरात पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला, अशी माहिती उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.