नाशिक : भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि कार्यान्वित करण्याचे एकमेव प्रभावी माध्यम म्हणजे प्रशासकीय अधिकारी. अधिकारी होण्यासाठी शिडी म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा. प्रत्येकाला शिडीचे शेवटचे टोक गाठता येईलच असे नाही. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नाशिक येथील गौरव कायंदे पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. आणि सलग दुसऱ्या वर्षी ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये नाशिक येथील गौरव कायंदे पाटील यांनी २५० वे स्थान मिळविले. गौरव यांनी ही परीक्षा दुसऱ्यांदा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. सध्या गौरव हे हैद्राबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीत भारतीय पोलीस प्रशासनाचे (आयपीएस) प्रशिक्षण पूर्ण करत आहेत.

मात्र हा प्रवास सोपा नव्हता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हणजे यश-अपयशचा हिंदोळा. गौरव यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हा टप्पा पार पाडत उल्लेखनीय यश संपादन केले. गौरव यांनी संगणक अभियंता पदवी मिळवली आहे. कॅलिफोर्निया (अमेरिका) स्थित टिब्को सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी करताना त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे पुन्हा लक्ष देणे सुरु केले. परीक्षेच्या तयारीसाठी वेळ कमी पडत असल्याने त्यांनी राजीनामा दिला. परंतु, कंपनीने तो स्वीकारला नाही. गौरव यांनी आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळ अपुरा पडत असल्याने कार्यमुक्त करण्याचे पटवून दिल्यानंतर त्यांचा अभ्यासाचा मार्ग खऱ्या अर्थाने खुला झाला.

यादरम्यान, त्यांनी सार्वजनिक प्रशासन विषयात पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. पीएच.डी. करायची म्हणून नेट परीक्षाही उत्तीर्ण केली. हे सर्व करत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी सुरू होती. आयोगाच्या २०२४ पूर्व परीक्षेसाठी एकूण १३.४ लाख विद्यार्थी बसले होते. त्यातून १४६२७ मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षेचा निकाल नऊ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. १४६२७ पैकी मुलाखतीसाठी २८४५ उमेदवार पात्र झाले. त्यांच्या मुलाखती सात जानेवारी ते १७ एप्रिल या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालयात झाल्या. या परीक्षेत गौरव यांना २५० वे स्थान मिळाले.

गौरव यांच्या वाटचालीत त्यांच्या कुटूंबातील प्रत्येकाचा सहभाग राहिला. वडील डॉ. गंगाधर कायंदे पाटील हे गोखले शिक्षण संस्थेच्या भि.य.क्ष. महाविद्यालयात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते .ते लेखकही आहेत. आई डॉ. हेमलता, भाऊ चैतन्य यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळे यशाची वाट सापडल्याची भावना गौरव यांनी व्यक्त केली.