नाशिकप्रमाणेच कोकणातही गड, किल्ल्यांची संख्या विपुल आहे. घोटीतील गिर्यारोहकांच्या गटाने इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या बळावर कोकणातील प्रबळ आणि कलावंतीण या दोन खडतर किल्ल्यांवर स्वारी करण्यात यश मिळविले.
प्रबळ व कलावंतीण हे दोन्ही किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी. प्रबळ या किल्ल्यालाच मुरंजन किल्ला असेही म्हटले जाते. प्रबळ व कलावंतीण हे दोन्ही किल्ले समोरासमोर आहेत. घोटीच्या गिर्यारोहकांनी यापूर्वी अलंग, मदन, हर्ष, त्रिंगलवाडी, विश्रामगड आदी जवळपास डझनभर किल्ल्यांची सफर केली आहे.
या मोहिमेत भगीरथ मराडे यांच्यासह गणेश सूर्यवंशी, नीलेश पवार, प्रशांत येवलेकर, अशोक टेमके, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, प्रशांत जाधव, महेंद्र आडोळे, गजानन चव्हाण, विनायक कडू, सुरेश डावखर यांनी सहभाग घेतला.
प्रबळगड हा उत्तर कोकणातील किल्ला असून त्याच्यावरून पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यात येत असण्याची शक्यता आहे. किल्ल्यावर गुहा आहेत. या गुहांमुळेच शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी येथे लष्करी चौकी बनवून त्यास ‘मुरंजन’ हे नाव दिले.
नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो गेला. शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या असता शहाजीराजे, जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनवर राहिले.
१६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशाहचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. १६५६ मध्ये मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून ‘किल्ले प्रबळगड’ असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला.
घोटीच्या गिर्यारोहकांनी स्वारी केलेला कलावंतीण दुर्ग मुंबई-पुणे महामार्गावरून सहजपणे दिसतो. एका कलावंतीण राणीला या किल्ल्यावर महाल बांधून देण्यात आल्याने त्याचे नाव कलावंतीण असे पडले.
हा दुर्ग प्रबळगडालगत आहे. दुर्गावर जाण्यासाठी खडक फोडून पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.
या दुर्गाशी प्रबळ गावातील आदिवासींचे जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमगा सणाला या दुर्गावर नृत्य करतात.
या दुर्गावरून माथेरान, चंदेरी, पेब, कर्नाळा हे किल्ले दिसतात. या दोन किल्ल्यांना भेट दिल्याने घोटीतील गिर्यारोहकांच्या ऐतिहासिक ज्ञानात चांगलीच भर पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा