लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : तब्बल २८० टायर आणि सुमारे ९० फूट लांबीचा अजस्त्र कंटेनर आणि त्यावर तितकाच लांब आणि २२ फूटहून अधिक उंचीचा महाकाय बॉयलर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करताना चांगलीच कसरत होत आहे. या अजस्त्र कंटेनरला जाऊ देण्यासाठी बुधवारी पिंपळगाव टोल नाक्यावर दुचाकी वाहनांची मार्गिका काही काळ बंद ठेवावी लागली. महामार्गावरील माहितीदर्शक फलक तात्पुरते हटवावे लागले.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने लांबलचक कंटेनरमधून तितकाच महाकाय बॉयलर दिल्लीकडे नेला जात आहे. मंगळवारी सायंकाळी तो पिंपळगाव टोल नाक्याजवळ पोहोचला होता. सायंकाळी त्याला टोल नाका ओलांडण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याच्या आकारमानामुळे टोल नाका परिसरातून तो पुढे नेण्यासाठी काही वेगळी व्यवस्था करावी लागणार होती. बुधवारी सकाळी दुचाकी वाहनांची मार्गिका बंद ठेवून कंटेनरसाठी व्यवस्था करावी लागली. टोलनाका ओलांडण्यास या कंटेनरला सुमारे दोन तास लागल्याची माहिती पिंपळगाव टोल नाक्याचे व्यवस्थापक आत्माराम नथले यांनी दिली.
टोल नाक्याहून निघालेल्या कंटेनरचा पुढील प्रवासही आव्हानात्मकच आहे. महामार्गावर विशिष्ट काही अंतरावर संपूर्ण मार्ग व्यापणारे आडवे माहितीदर्शक फलक आहेत. कंटेनरवरील बॉयलरची उंची २२ फूटहून अधिक आहे. त्यामुळे या फलकांखालून कंटेनरला पुढे नेणे अवघड ठरत आहे. कंटेनरबरोबर दोन क्रेनही आहेत. पिंपळगाव-वडाळीभोईदरम्यान क्रेनच्या मदतीने असे माहितीदर्शक फलक तात्पुरते काढण्यात आले. कंटेनर पुढे गेल्यावर नंतर हे फलक बसविण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागली.
महाकाय स्वरुपाचे असे अजस्त्र कंटेनर वर्षभरात क्वचितच महामार्गाने जातात. कंटेनरचे भव्य स्वरुप पाहून आसपासचे रहिवासी, शालेय विद्यार्थी आणि मार्गस्थ होणारे वाहनधारक चकीत होत आहेत. प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओची विशेष परवानगी घेऊन अशी महाकाय वाहने अवाढव्य सामग्री घेऊन मार्गक्रमण करू शकतात, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
केवळ दिवसा प्रवास
अवाढव्य सामग्री घेऊन निघालेल्या अशा अजस्त्र कंटेनरला केवळ दिवसाच प्रवासाची मुभा असते. रात्री अशा वाहनांना प्रवासास प्रतिबंध आहे. ही वाहने मार्गस्थ होताना महामार्गालगतच्या शहर व मोठ्या गावांमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना पुढे मार्गस्थ केले जाते, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.