“समाजाचं मनोरंजनीकरण झालं असताना आणि समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मधे उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे,” असं मत लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी माध्यमांचं मनोरंजनीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजनीकरण झालं आहे, असंही निरिक्षण मांडलं. तसेच समाजाला वैचारिकतेकडे नेण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.
गिरीश कुबेर म्हणाले, “माध्यमं हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे माध्यमांचं मनोरंजनीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजनीकरण झालंय. समाजात वैचारिकतेचा अभाव असेल तर तो माध्यमांमध्येही तो तसाच दिसेल. त्याचवेळी माध्यमांची खरी जबाबदारी असते ती अशा समाजाला वैचारिकतेकडे नेणं. माधम्यांमध्ये का यायचं याबाबत माझे संपादक गोविंद तळवलकर यांनी भूमिका सांगून ठेवली होती. तसं करण्याचीच माझी आस होती. समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी मधे उभं राहून दुसरी दिशा दाखवली पाहिजे. आता उलटं झालं आहे, समाज एका दिशेने जात असेल तर माध्यमं देखील त्याच दिशेने जातात. माध्यमं आधी पुढे पळतात की समाज पुढे पळतो अशा प्रकारचं सध्या चित्र आहे. हा माध्यमांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे.”
“लोकांना चांगलं वाचायला आवडत नाही असं म्हणणं माध्यमांचा पराभव”
“सध्या जे होतंय ते माध्यमांनी स्वतःची जबाबदारी टाकणं आहे. ही जबाबदारी माध्यमांनी सामूहिकपणे सोडून दिली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. माध्यमं जर लोकांना चांगलं वाचायला आवडत नाही असं म्हणत असेल तर याच्या इतका मोठा माध्यमांनी स्वतःच स्वतः केलेला पराभव दुसरा असू शकत नाही. लोकांना चांगलं वाचायला आवडत नसेल तर याचा साधा अर्थ असा आहे की लोकांना चांगलं वाचायला देता येईल अशी क्षमता त्या माध्यमांमधील लोकांमध्ये नाही. ती क्षमता आम्ही गमावून बसलो आहे. पुढील समाजाच्या प्रगतीसाठी हा मोठा धोका आहे,” असं गिरीश कुबेर यांनी सांगितलं.
“इतिहासातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनांमागे माध्यमांनी भूमिका”
“भारताचा जगाचा किंवा इतिहासाचा टप्पा काढून पाहिला तर प्रत्येक महत्त्वाच्या घटनेला आकार देण्याचं किंवा घटना घडवण्यामागील प्रेरणा देण्याचं काम माध्यमांनी दिलीय. माध्यमांनी त्या काळाला आकार द्यायचा असतो. काळाला घडवणं, किमान तसा प्रयत्न करणं हा त्या माध्यमांच्या जबाबदारीचा भाग असतो. ती जबाबदारी आम्ही सोडून देतोय असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. कारण मग माध्यमांचं काम काय?” असा सवाल गिरीश कुबेर यांनी विचारला.
“लोकांच्या आवडीसोबत त्यांना जे द्यायला हवं तेही द्यावं”
गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “माझ्यामते कुठल्याही माध्यमांना दोनच कामं असतात. एक लोकांना जे हवं आहे ते द्यायचं आणि लोकांना जे द्यायला हवं असं आपल्याला वाटतं ते द्यायचं. आपल्याला वाटतं म्हणजे काय? तर संपादक मंडळाने तो निर्णय घ्यायचा असतो. माध्यमांचं ते अतिशय महत्त्वाचं काम आहे, पण माध्यमांमधील लोकच लोकांना वाचायला आवडत नाही असं म्हणत असतील तर आपल्या उद्दिष्टाचा अर्थ काय? आपण या व्यवस्थेत आहोत याचा अर्थ काय? हा प्रश्न माध्यमांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्याचा अर्थ सापडत नसेल तर माध्यमांची अर्थशून्यता दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे.”
हेही वाचा : विचारसरणीच्या तळाशी अर्थविषयक जाणिवेचा गाभा महत्त्वाचा – गिरीश कुबेर
“दुर्दैवाने सध्या माध्यमकर्मीच आपल्या या निरर्थीकरणाला मोठ्या प्रमाणावर बळ देत आहेत. प्रत्येकाची प्रत्येक भूमिक प्रत्येकवळी प्रत्येकाला मान्य होईल असं कधीच नाही. असं होऊच शकत नाही. तुम्ही सगळ्यांना आनंदी करू शकत नाही, हे स्टिव्ह जॉबचं वाक्य माझं आवडतं आहे. तो पुढे म्हणतो तुम्हाला सर्वांना आनंदी करायचं असेल तर तुम्ही आईसक्रिमचं दुकान टाका म्हणजे येणारा प्रत्येक जण आनंदी होऊनच जाईल. माध्यमांनी समोरच्याला किती वाईट वाटतंय, किती चांगलं वाटतंय, किती गोड वाटतंय, किती कडू वाटतंय याचा विचार न करता आपल्याला जी न्याय्य भूमिका वाटते ती स्वतःच्या बौद्धिक ताकदीवर घ्यायला हवी,” असंही त्यांनी नमूद केलं.