जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा टोला
मनसेच्या चष्म्यातच बिघाड असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जात असल्याचे दिसते. जो पक्ष नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे त्यांनी असे काही बोलू नये, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज्य सरकारचे मंत्री दुष्काळी भागात पर्यटनासाठी दौरा करतात, या ठाकरे यांच्या विधानावर महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी महाजन यांच्या उपस्थितीत खरीप पीक व जलसंवर्धन आढावा बैठक झाली. यावेळी महाजन यांनी राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीविषयी गंभीर असून उपायांच्या दृष्टिने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद
केले. विरोधकांनीही पाण्याचे राजकारण करू नये. जो पक्ष सध्या नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्या पक्षातून इतर राजकीय पक्षांकडे नगरसेवक जात आहेत, त्यांनी दुसऱ्यांविषयी काही बोलू नये, अशी टीका महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील महिलांच्या गर्भगृह प्रवेशासंदर्भात त्र्यंबकवासियांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करावा. आपल्या भावना, परंपरा बाजूला ठेवत वाद घालण्यापेक्षा सद्यस्थितीचा स्वीकार करावा. न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे तो मुख्यमंत्र्यांसह सर्वाना मान्य आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. खरीप पीक आढावा बैठकीआधी महाजन यांनी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला भेट देऊन उपलब्ध जलसाठय़ाची माहिती घेतली.

Story img Loader