गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना रविवारी ( १२ फेब्रुवारी ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिलं होतं. आपण एकत्र आलो नाहीतर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावं लागेल. तसेच, निवडणुका घेण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “एकच वर्ष निवडणुका राहिल्या आहेत. पाच वर्षातून पाचवेळा थोडीच निवडणुका होत असतात. आमच्या भरवशावर १८ खासदार आणि ५५ आमदार निवडून आणले. तेव्हा आम्ही म्हटलं असतं, निवडणुका घ्या; मग घेतल्या असत्या का… त्यावेळी तुम्ही पळून जात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसला.”
हेही वाचा : काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “मला…”
“महापालिका निवडणूक समोर असून, तुम्ही मैदानात या. तुमच्या बाजूनं किती लोकमत आणि जनमत आहे, हे दाखवा,” असे आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
हेही वाचा : अजित पवारांचा बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना खोचक टोला; म्हणाले, “बेडकाला वाटतं…”
उद्धव ठाकरेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. “उद्धव ठाकरे असं काहीतर बोलत असतात. सध्यातरी भारताच्या संविधानाप्रमाणे एकत्र निवडणुका होत नाहीत. उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे; त्याला समर्थन द्यावं. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ,” असं देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.