लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : माझ्यामुळे झाले, मी होतो म्हणून झाले, मीच सर्वकाही आहे, अशी भाषा अनेक जण करतात. पक्षाच्या पुढे कोणीच मोठा नाही. भाजपमध्ये ३०-३५ वर्षे मंत्री होते, २०-२२ वर्षे लाल दिव्याची गाडी होती. एकदा पराभूत होताच पक्ष सोडून गेले. माझ्यामुळे भाजप आहे, असे म्हणणारे अनेक मातब्बर आज थप्पीला लागले आहेत, अशी टीका करत नामोल्लेख टाळत भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले.
महायुतीच्या वतीने रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज २५ एप्रिलला भरण्यासाठी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असल्याचे सांगितले. शहरातील आदित्य लॉन्स येथे जळगाव मतदारसंघातील उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात सर्वांनीच खडसे यांच्यासह पक्ष सोडून गेलेले उन्मेष पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले. मंत्री महाजन यांनी, उन्मेष पाटील पुन्हा उमेदवारी मिळाली नाही, म्हणूनच आठ दिवसांत दुसर्या पक्षात गेल्याचे सांगितले. माजी खासदारांचा संसदेतील कामात पहिल्या दहामध्ये समावेश होता, तर त्यांनी स्वतः उमेदवारी का घेतली नाही ? करण पवार यांना त्यांनी बळीचा बकरा बनविले आहे, असा आरोप केला.
आणखी वाचा-जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर
आमदार मंगेश चव्हाण यांनीही, योग्य वेळ आल्यावर माजी खासदाराचा संपूर्ण चित्रपट दाखविणार असल्याचे सांगितले. पक्षात तुमची इतकी घुसमट होत होती, तर लोकसभेच्या उमेदवारीसाठी का पाया पडत होतात, असा प्रश्न आमदार चव्हाण यांनी केला.
मंत्री अनिल पाटील, आमदार चिमणराव पाटील यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. याप्रसंगी महायुतीच्या घटकपक्षांतील जिल्हाध्यक्षांनी मनोगतात एकमेकांना चिमटे घेतले. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे उमेदवारी अर्ज २५ एप्रिल रोजी दाखल करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.