लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यात काही ठिकाणी केवळ कॉपीच्या भरवशावर परीक्षा केंद्र चालू आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुले मराठवाडा, विदर्भात जातात. पैसे भरून प्रवेश घेतात. कधीही शाळेत न जाता उत्तीर्ण होतात, याकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष वेधले. कॉपीसाठी जे शिक्षक, पोलीस वा शालेय कर्मचारी मदत करतील, त्यांना बडतर्फ करण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेत राज्यात अनेक गैरप्रकार होत आहेत. महाजन यांचा जळगाव जिल्हाही त्यास अपवाद नाही. यासंदर्भात त्यांनी गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले. कॉ़पीच्या प्रकारांचे आश्चर्य वाटते. काही विद्यार्थी कॉपीच्या भरवशावर उत्तीर्ण होतात. त्यांचे पुढील भविष्य काय, हा संशोधनाचा विषय आहे. कॉपी करून मुले पदवीधर होतात. मग सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरतात.
अनेक शाळांकडून अशा केंद्रांवर पैसे घेऊन अर्ज भरले जातात. नियोजनबद्धरितीने गैरप्रकार केले जातात. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. यानंतर काही शिक्षक एकत्रितपणे आपणांस भेटायला आले होते. अशी कारवाई झाल्यास पटसंख्येचे काय होईल, असे त्यांचे म्हणणे होते. मुळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा. शिक्षकांनी शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे महाजन यांनी नमूद केले.
नाशिक दौऱ्यात कुंभमेळामंत्री म्हणून सिंहस्थाच्या तयारीचा धावता आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात नाशिकच्या शासकीय अधिकाऱ्यांचे पथक प्रयागराजला पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथील काही संस्थांना नाशिकला बोलविता येईल का, यावर विचारविनिमय केला जाईल, असे महाजन यांनी सांगितले.
शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. या प्रकरणात कायदेशीर बाबी तपासून कोकाटे यांच्याबाबत निर्णय होईल, असे ते म्हणाले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यास उशीर होत आहे. कुंभमेळा आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर एकत्रितपणे लवकरच निर्णय घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी या संदर्भात चर्चा झाली असल्यास एक-दोन दिवसात तोडगा निघू शकतो, असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, महाजन यांनी कॉपीवरुन शिक्षण खात्याला लक्ष्य केल्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत शिक्षणमंत्री दादा भुसे, आणि जलसंपदामंत्री महाजन यांच्यात स्पर्धा आहे. याआधी महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर स्थगिती मिळाली होती. अद्याप हा तिढा सुटलेला नाही. यात महाजन यांनी कॉपीवरून शिक्षण विभागाच्या कारभारावर बोट ठेवले आहे.