लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षांत युती झाल्याने नाशिक विभागात शिवसेना-भाजपमध्ये समन्वय दृढ करण्याची जबाबदारी शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन या मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे.
नाशिकसह धुळे, जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून शिवसेना विरोधी पक्षात आहे. सेनेकडून भाजपला कोंडीत पकडले जाते. भाजप सेनेच्या दबाव तंत्राला जुमानत नाही. विविध कारणांस्तव दोन्ही पक्षातील वितुष्ट लोकसभा निवडणुकीत बाजूला ठेवले जावे, दुभंगलेली मने जोडण्याची कसरत या मंत्र्यांना करावी लागणार आहे.
उत्तर महाराष्ट्रासह विचार करता मागील लोकसभा निवडणूक वगळता पाच वर्षांत विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्ष परस्परांविरोधात लढले.
निवडणुकीआधी सर्वपक्षीयांसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले करणाऱ्या भाजपने शिवसेनेच्या सदस्यांना गळाला लावण्यात हात आखडता घेतला नाही.
दुसरीकडे नाशिक, धुळे महापालिकेच्या निवडणुकीत सेनेला गृहीत धरले नाही. जळगाव महापालिका निवडणुकीत अखेपर्यंत युतीची चर्चा झाली होती. ऐनवेळी सेना-भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरले. नाशिक, धुळे, जळगाव तिन्ही महापालिकांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले.
मागील साडेचार वर्षांत शिवसेनेने भाजपचे उट्टे काढण्याचे प्रयत्न केले. वाढती गुन्हेगारी, धरणांचे पाणी मराठवाडय़ाला देण्यास विरोध आदी कारणांवरून भाजप विरोधात सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता. नाशिक पालिकेत भाजपला स्थायी समितीत धक्का देण्याची धडपड सेना करत आहे.
सत्तेत असूनही सेनेच्या कुरघोडीच्या राजकारणास भाजप पदाधिकारी वैतागले. बहुतांश निवडणुकीत परस्परांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या या दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीने एकत्र आणले आहे.