नाशिक – आगामी कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. गर्दीच्या दृष्टीने सुक्ष्म पातळीवर आराखड्याचे नियोजन करावे, अतिक्रमण हटविण्याची मोहीम तत्काळ हाती घ्यावी, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या कामाला वेग द्यावा आणि साधूग्रामचे क्षेत्र एक हजार एकरपर्यंत विस्तारावे, असे निर्देश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
रविवारी महाजन यांनी कुंभमेळा क्षेत्राची पाहणी करून नियोजित कामांचा बैठकीत आढावा घेतला. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते. कुंभमेळ्यात मागील तुलनेत चार ते पाच पट अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे यासंबंधीची कामे तातडीने प्रस्तावित करून सुरू करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. पंचवटीतील रामकुंड परिसर आणि त्र्यंबकेश्वर नगरीत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. सिंहस्थ कामांत त्यांचा अडसर ठरू शकतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तातडीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यास सांगण्यात आले. प्रयागराजच्या धर्तीवर एक हजार एकर क्षेत्रावर साधुग्रामचा विस्तार केला जाईल. रस्त्यांच्या कामांना वेळ लागणार आहे. ही कामे तातडीने सुरू करावीत, असे महाजन यांनी सूचित केले.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त राखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी व नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. मागील कुंभमेळा दुर्घटनेविना पार पडला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरात पाच तात्पुरते तर त्र्यंबकेश्वरला पाच कायमस्वरुपी हेलिपॅड प्रस्तावित करण्यात आले. ओझर विमानतळावर वाहनतळासाठी अतिरिक्त जागा प्रस्तावित करण्याची सूचना करण्यात आली.
शहरवासीयांना सहभागी करणार
गतवेळी पहिल्या पर्वणीत पोलिसांनी अतिरेक केला होता. स्थानिकांना घराबाहेर जाण्यास प्रतिबंध केला. यावेळी तसा अतिरेक होणार नाही. उलट नाशिककरांना कुंभमेळ्यात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आढावा बैठकीत सूचित करण्यात आले.