जळगाव: तापी नदीला आलेल्या पुरामुळे आणि पाणी फुगवट्यामुळे जिल्ह्यात बाधित पिकांची तत्काळ स्थळपाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत.
संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी रावेर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. मध्य प्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने, तसेच तापी नदीचा फुगवटा नदीकाठच्या गावांतील पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा… धुळे जिल्ह्यातून पाच गुन्हेगार हद्दपार; सात जणांविरुद्धही प्रस्ताव
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावांतील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायकांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही मंत्री महाजन यांनी दिल्या आहेत.