लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : लोकसभा निवडणुकीत कष्ट करूनही जळगावच्या दोन जागा वगळता उत्तर महाराष्ट्र आणि अहिल्यानगरमध्ये एकही जागा मिळाली नाही. नाशिक विभागात विधानसभेच्या ४४ जागा आल्या म्हणून सर्व आलबेल असल्याचे समजू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. या भागातील एकही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सोडायची नाही, असा निर्धार करून सक्रिय व्हावे. नाशिक महापालिकेत १०० हून अधिक जागा मिळविण्याच्या दृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भाजपच्यावतीने शनिवारी येथे संघटनपर्व विभागीय कार्यशाळा घेण्यात आली. मार्गदर्शन करताना महाजन यांनी कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नका, असा सूचक संदेश दिला. अहिल्यानगर महापालिकेत मागील निवडणुकीत भाजपचे केवळ १२ नगरसेवक होते. महापौर निवडणुकीत ही संख्या आपण ४२ वर नेऊन भाजपचा झेंडा कसा फडकवला याची गोष्टही त्यांनी कथन केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला विक्रम करायचा आहे. सदस्य नोंदणीसाठी सर्वांनी सक्रिय व्हावे. प्रत्येकाने दिलेले इष्टांक पूर्ण करावे. सक्रिय सदस्य होत नाही, तोपर्यंत तिकीटासाठी विचार केला जाणार नाही, असा संदेश यावेळी देण्यात आल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.