शिकवणीहून घरी परतताना घंटागाडीखाली सापडून चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची घटना गुरुवारी सकाळी सिडकोतील तानाजी चौकात घडली. या अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी घंटागाडी चालकाला चोप देत अपघाताला महापालिकेच्या गलथान कारभारास जबाबदार ठरवले. लोकप्रतिनिधी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कुत्रा मागे लागल्याने धावताना तिचा पाय गटारीच्या ढाप्यात अडकला आणि त्यावेळी घंटागाडी तिच्या अंगावरून गेल्याचे सांगितले जाते. पालिकेच्या गलथानपणाची शिक्षा चिमुकलीला सहन करावी लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नेहा जिजाबराव ठाकरे (९) असे या मुलीचे नाव आहे. तानाजी चौक परिसरातील एन ३२ सेक्टरमध्ये वास्तव्यास असणारी नेहा अभिनव बालविकास मंदिरमध्ये तिसरीत शिकत होती. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ती गणेश चौक परिसरातील शिकवणीला गेली. तिथून परतताना रस्त्यात तिच्या मागे कुत्रा धावला. यामुळे भयभीत झालेली नेहा रस्त्याच्या मध्य भागातून गणेश चौकाकडे धावत असताना तिचा पाय गटारीच्या ढाप्यात अडकला. या ढाप्याची रचना जाळीसारखी असल्याने पाय फसला. अडकलेला पाय काढण्याच्या झटापटीत ती खाली बसली असता समोरून येणाऱ्या घंटागाडी चालकाला ती दिसली नाही. काही कळायच्या आत ती गाडीखाली सापडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. या अपघातात नेहाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर चालक शंकर रामभाऊ आवारे याच्या हा प्रकार लक्षात आला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला उपस्थितांनी पकडून चोप दिला. काहींनी घंटागाडीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात लोकप्रतिनिधींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पालिकेचे विभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांनी पालिकेच्या गलथान कारभाराचा पाढा वाचत संताप व्यक्त केला. पोलिसांनी जमावाचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला.
नेहाच्या अपघाती मृत्यूची माहिती समजल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मारहाणीत जखमी झालेल्या चालकाला पोलिसांनी अटक करून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आ. सीमा हिरे यांनी अपघातास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी आणि ठाकरे कुटुंबीयांस मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Story img Loader