नाशिक – नाशिकरोड येथील मालधक्का रस्त्यामागे आणि गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटीलिंक बस आगारात बसची धडक बसल्याने पाच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. अपघात होताच संशयित चालक पळून गेला. संतप्त जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. संशयित वाहनचालकाविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सानू गवई (रा. मातोश्री आंबेडकर नगर, नाशिकरोड) असे बालिकेचे नाव आहे. सानू ही आदर्श विद्यामंदिरात पूर्व प्राथमिकमध्ये शिकत होती. शाळा सुटल्यावर आजोबांबरोबर घरी जात असतांना सिटी लिंक बस आगाराच्या आवारात तिला बसची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आजोबाही जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक पळून गेला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी, कामगारांनी सिटी लिंक व्यवस्थापनाला धारेवर धरले. यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना, दोन महिलांसह युवकाचा मृत्यू

सिटीलिंक बस चालकांचा मनमानी कारभार यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहर परिसरातील मुख्य रस्त्यांवर बस पुढे दामटत असतांना अनेकदा चालक सिग्नलकडे दुर्लक्ष करतात. शहरातील पादचारी रस्त्यावरही आक्रमण करुन वाहन चालविण्याचा प्रयत्न होतो. रिक्षाचालक आणि सिटीलिंक बस चालकांचा बेशिस्तपणा ही नाशिककरांसाठी डोकेदुखी झाली आहे. प्रत्यदर्शीने दिलेल्या माहितीनुसार बस वाहनचालक नव्हे तर, बस धुणारी व्यक्ती चालवित होती. गाडी मागे घेत असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl dies after being hit by a citylink bus in nashik amy
Show comments