लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : गरम चहा अंगावर पडल्याने भाजलेल्या दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. १२ दिवसांपासून ही बालिका रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होती. ओरान मुसा शेख असे या बालिकेचे नाव आहे. जेलरोड येथील कॅनॉल रस्ता भागात सहा फेब्रुवारी रोजी घरात खेळत असतांना ओरानच्या अंगावर उकळता चहा सांडला होता. ती भाजल्याने वडील मुसा शेख यांनी तातडीने तिडके कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. १२ दिवस तिने मृत्युशी झुंज दिली. उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

टोळक्याच्या मारहाणीत दोन जण जखमी

दिंडोरी रस्त्यावरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या दोन मित्रांना टोळक्याने बेदम मारहाण केली. यावेळी लाकडी बांबूसह खुर्चीचा वापर करण्यात आल्याने दोघे जखमी झाले.

याबाबत आशिष भामरे (२६, शिवाजीनगर, सातपूर) या युवकाने तक्रार दिली. भामरे आणि अनिकेत कापडणीस (शिवाजीनगर,सातपूर) हे दोघे मित्र म्हसरूळ परिसरातील हॉटेल खमंग येथे रात्री जेवणासाठी गेले होते. त्यावेळी महागड्या मोटारीतून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. लाकडी बांबू, लोखंडी खुर्चीचा वापर करण्यात आल्याने दोघे मित्र जखमी झाले. यावेळी भामरे यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी गहाळ झाली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेची सोनसाखळी खेचली

पखाल रस्ता भागात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेली. याबाबत इंदूमती खोडे (६६, खोडेनगर, संत सावता माळी मार्ग, वडाळा शिवार) यांनी तक्रार दिली. खोडे मंगळवारी सायंकाळी शिकवणीस गेलेल्या नातीला घेण्यासाठी निघाल्या होत्या. पखाल रस्त्याने पायी जात असतांना आनंद पाईप्स या दुकानासमोर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपयांची सोन्याची पोत हिसकावली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस स्थानकातून महिलेचे दागिने लंपास

मेळा स्थानकात बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दीड लाख रुपयांचे दागिने चोरण्यात आले. याबाबत अश्विनी आहेर (तारवालानगर, पंचवटी) यांनी तक्रार दिली. आहेर या सोने तारण कर्ज काढण्यासाठी सटाणा येथे जाणार होत्या. त्यासाटी मंगळवारी सकाळी त्या मेळा स्थानकात पोहोचल्या. नाशिक-सटाणा या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी आहेर यांच्या पर्समधील सोन्याची पोत आणि बांगड्या असे सुमारे एक लाख ४५ हजाराचे दागिने चोरले. बसमध्ये बसल्यानंतर चोरीचा प्रकार आहेर यांच्या लक्षात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader