इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या टाकेदजवळील आधारवाडी येथे चार ते पाच दिवसांपूर्वी बिबट्याने के लेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिके चा सोमवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिन्यांत मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.
आधारवाडी येथील चार वर्षांची बालिका जया धोंडीराम चवर ही १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पडवीच्या अंगणात लहान भावंडांबरोबर खेळत होती. अचानक त्या ठिकाणी आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. तिच्या रडण्याच्या आवाजाने तसेच मुलांनी आरडाओरड के ल्याने बिबट्या पळून गेला. हल्ल्यात जखमी झालेल्या जयावर नाशिक जिल्हा रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची मृत्यूशी असलेली झुंज अयशस्वी ठरली. सोमवारी रात्री तिचा मृत्यू झाला. बिबट्याचा वावर आणि हल्ले वाढल्याने शेतांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी याआधीही केली होती.
दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू होण्याची इगतपुरी तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. तीन मृत्यू झाले असले तरी यापैकी एकाही ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. चिंचलेखैरे येथे एका वृद्ध महिलेचा तर कुरुंगवाडी येथे एका वृद्धाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढू नये, यासाठी वनविभागाने त्वरित बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.