वणी : वणी-सापुतारा रस्त्यावरील घाटबारी येथे मोटार रस्त्यालगतच्या झाडाला धडकून युवती ठार, तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात प्रज्ञा गायकवाड (२१) या युवतीचा मृत्यू झाला. तिचे वडील डॉ. प्रकाश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. गुजरात राज्याच्या सीमेवर सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे डॉ. प्रकाश गायकवाड यांचा दवाखाना आहे. काही दिवसांपूर्वीच मुलगी प्रज्ञाला नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. वैद्यकीय शिक्षणासाठी मुलीला नाशिकला सोडण्यासाठी बुधवारी सकाळी ते कारने निघाले होते. घाटबारी येथे उतारावर काही कारणांनी त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांसह पोलिसांनी धाव घेतली. गंभीर जखमी गायकवाड यांच्यावर वणी येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, आप्तस्वकीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. गायकवाड हे काही दिवसांपूर्वी अपघातातून बचावले होते. मध्यंतरी त्यांनी नवीन कार खरेदी केली होती. तिला अपघात झाला होता. नवीन मोटार दुरुस्तीसाठी पाठविली. ती दुरुस्त होईपर्यंत त्यांनी नातेवाईकाकडे दिलेली जुनी कार पुन्हा वापरण्यास घेतली. तिलाच अपघात झाला. कळवण तालुक्यातील शिवभाडणे गावात शोकाकुल वातावरणात मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.