नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीचा प्रभातफेरी सुरू असतांना चक्कर आल्याने मृत्यू झाला.
जनता विद्यालयातील नववीच्या वर्गातील पूजा दादासाहेब वाघ (१५) हिला शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदनासाठी प्रभात फेरीने जात असताना चक्कर आली. तिला तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पूजाची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. वाटेतच तिचे निधन झाले.
हेही वाचा – जळगाव : भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, ३.३ रिश्टर स्केल तीव्रता
पूजाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाला जन्मापासूनच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असे. तिची तपासणी केली असता तिच्या फुफ्फुसाला छिद्र असल्याचे निदान झाले होते, त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. परंतु, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिचे निधन झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करण्यात येईल, असे सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम पूजाच्या मृत्यूमुळे रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.