सोने किंवा पैसे दुप्पट करून देतो अशा फसवेगिरीच्या घटना वाढत असताना वारंवार हात पोळूनही सर्वसामान्य नागरिक यातून कोणताही धडा घेण्यास तयार नाही. मंगळवारी त्याचा प्रत्यय देणारी घटना उपनगर परिसरात घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ‘कमी किमतीत दुप्पट सोने देतो’ अशी बतावणी करणाऱ्या राजस्थानच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळाले. या प्रकरणी तीन संशयितांना पकडण्यात आले असून पळालेल्या महिलांचा शोध सुरू आहे. गुप्तधन सापडल्याचे दर्शवत अशा भूलथापा देणाऱ्यांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरात राजस्थानी पेहरावातील काही व्यक्ती फिरत असून त्यांनी भूलथापा देत सर्वसामान्यांना गंडविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. याआधी टोळीतील काही संशयितांनी ग्रामीण भागात आपले कौशल्य दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा संशय आहे. या पद्धतीचे काही प्रकार शहरात घडले. उपनगर भागात असे काही संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत तिघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर या टोळीची कार्यपद्धती उघड झाली. राजस्थानी पेहरावातील हे संशयित आपल्या पत्नीसमवेत शहरात भ्रमंती करून सावज हेरतात. कमी किमतीत बनावट सोन्याचे मणी आणि दागिन्यांची विक्री करण्याचा त्यांचा उद्योग. आपल्याजवळील सोन्याचा मणी ग्राहकाच्या हाती द्यायचा. ते कमी किमतीत विकत घ्या, सोन्याचे नसतील तर परत करा, असे सांगायचे. आपण राजस्थानमधील आहोत. तिथे खोदकामाचा व्यवसाय करताना मोठय़ा प्रमाणात गुप्तधन सापडले. इतक्या धनाचे काय करायचे, हा प्रश्न मांडून त्याचा पैसा करून घेण्यासाठी विक्री करत असल्याचे सांगून संशयित ग्राहकास गुंगवून टाकायचे. ग्राहक घरच्या घरी किंवा सोनाराकडून तो मणी तपासून सोन्याचा आहे की नाही ही खात्री करून घेतो. मणी सोन्याचा आणि तोही नाममात्र किमतीत म्हटल्यावर कमी किमतीत अधिक सोने मिळणार या लालसेने ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकत गेले. या पद्धतीने पैसे देऊन मणी घेतले जायचे. खरेदीच्या व्यवहारात प्रत्यक्षात बनावट सोन्याचे मणी वा दागिने हातात ठेवले जाई.
उपनगर परिसरात मंगळवारी अशा वेशभूषेतील व्यक्ती पत्नीसमवेत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यात राजस्थान येथील सखाराम भिमाराम वाघेला, बल्लाराम देवाराम राठोड, कान्हाराम जेठाजी स्वयंची यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट सोन्याच्या स्त्री अलंकारांसह, सोनेरी रंगाचे घडय़ाळ, चार भ्रमणध्वनी व चांदीचे काही दागिने, नाणी यासह अन्य काही साहित्य जप्त करण्यात आले. कारवाई सुरू असताना संशयितांसमवेत असलेल्या महिलांनी पळ काढला. त्यांचाही शोध घेतला जात आहे. उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली उपनगर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कमी किमतीत अधिक सोन्याचे आमिष दाखवत बनावट दागिने देऊन फसवणूक केली जाते. नागरिकांनी या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.