सर्जनशील कलावंत नाना पाटेकर, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापक संचालिका कनक रेळे, महिला सबलीकरणाचे काम करणाऱ्या चेतना सिन्हा, प्रसिध्द गणितज्ज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. हितेंद्र व महेंद्र महाजन बंधू आणि प्रसिध्द वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारांचे वितरण १० मार्च रोजी येथे होणाऱ्या सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांची घोषणा शनिवारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वास्तुरचनाकार संजय पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. १९९२ सालापासून कुसुमाग्रज प्रतिष्ठान एक वर्षांआड हे पुरस्कार देत आहे. नृत्य, चित्रपट, लोकसेवा, विज्ञान, क्रीडा आणि वास्तुशिल्प या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी सांगितले. ही निवड प्रतिष्ठानचे आजी-माजी विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी केली. पुरस्कारांचे वितरण कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी १० मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात होणार आहे. २१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
भारतीय संगीत संस्कृतीत मोहनी अट्टम यांना अग्रस्थानी नेण्यात महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या कनक रेळे यांच्या नृत्य क्षेत्रातील कामगिरीची दखल प्रतिष्ठानने घेतली. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम चेतना सिन्हा करत आहेत. रसिकांच्या मनातील ‘नटसम्राट’ म्हणून नाना पाटेकर यांनी हिंदी, मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत स्वत:चे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना केल्याचे विश्वस्तांनी नमूद केले. सौर मंडळातील वातावरणात निसर्गाची भूमिका यावर संशोधन करणारे डॉ. चित्रे यांना विविध संस्थांनी फेलोशीप प्रदान केली आहे. जगातील सर्वात अवघड सायकल स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’मध्ये सहभागी झालेले डॉ. महाजन बंधुंच्या माध्यमातून पुरस्कार्थीमध्ये प्रथमच नाशिककराचाही समावेश झाला आहे. पर्यावरणात्मक वास्तुरचनेचा सखोल अभ्यास आणि शोधकार्याच्या उद्देशाने वास्तुशिल्प फाऊंडेशनची स्थापना करणाऱ्या अहमदाबादच्या बाळकृष्ण दोशी यांची वास्तुशिल्प गटात पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा