लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील सराफ बाजारात आठवडाभरापूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोने दरात मंगळवारी १२०० रुपये आणि चांदी दरात ३६०० रुपयांची घट नोंदवण्यात आली होती. मात्र, नंतरच्या दोन दिवसात दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा वाढ झाली. त्यानुसार, गुरूवारी सोने प्रति तोळा ९१ हजार १५५ रुपये, तर चांदी प्रति किलो एक लाख तीन हजार ७२१ रुपयांपर्यंत पोहोचली.

जळगावमध्ये गेल्या आठवड्यात मागचे सर्व उच्चांक मोडीत काढून सोन्याने प्रतितोळा ९१ हजार ८७६ रुपये आणि चांदीने एक लाख पाच हजार ६० रुपये प्रतिकिलोचा उच्चांक केला होता. त्यानंतर सोने व चांदीच्या दरात कमी-अधिक प्रमाणात सातत्याने घसरण सुरूच राहिली. मंगळवारी तीन टक्के जीएसटीसह सोने प्रति तोळा ९० हजार ६४० रुपयांपर्यंत खाली आले होते. अशाच प्रकारे तीन टक्के जीएसटीसह चांदी प्रति किलो एक लाख एक हजार ४५५ रुपयांपर्यंत खाली आली होती. परंतु, बुधवारपासून सोने व चांदीच्या दरात पुन्हा सुधारणा होण्यास सुरूवात झाली. मंगळवारच्या तुलनेत गुरूवारी चांदीत सुमारे २२६६ रुपयांची तसेच सोने दरात ५१५ रुपयांची वाढ नोंदवली गेली.

सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात. सध्या डॉलरचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीतील चढ-उतार आणि स्थानिक बाजारातील मागणी याचा एकत्रित परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होणार असल्याने मागणीत वाढ होईल आणि त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किंमतीने नवा उच्चांक गाठल्यामुळे खरेदीदारांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. ग्राहक कमी झाल्याने सुवर्ण व्यवसायाला मंदीला तोंड द्यावे लागत आहे.