नाशिक : शहर परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून ठिकठिकाणी सोनसाखळी चोरी झाली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून आडगाव, गंगापूर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी, वाढीव गस्त असे उपाय केले गेले असतांना चोऱ्या रोखण्यात अपयश आल्याने चोरांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

तपोवनातील मनिषा पवार (रा.केवडीबन, दंत महाविद्यालयामागे) या आई विमल सांगलीकर यांच्याबरोबर शनिवारी रात्री स्वामी नारायण मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून मायलेकी घराकडे पायी जात निघाल्या. विवियाना सोसायटीजवळून दोन्ही मायलेकी जात असतांना पाठीमागून आलेल्या एका तरूणाने सांगलीकर यांच्या गळ्यातील सुमारे ९४ हजार ५०० रुपयांची सोनसाखळी आणि पोत हिसकावून कन्नमवार पुलाखाली उभ्या असलेल्या दुचाकीस्वार जोडीदाराच्या दिशेने पोबारा केला. यानंतर दोघे भामटे अमरधामकडे जाणाऱ्या मार्गाने पसार झाल्याचे पवार यांनी सांगितले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा प्रकार गंगापूररोडवरील शांतीनिकेतन चौकात घडला. कविता आबड (रा.ऋषिराज होरायझन) या शनिवारी सायंकाळच्या वेळेस आपल्या नातूबरोबर परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. फेरफटका मारून दोघे घराकडे पायी जात असतांना शांतीनिकेतन चौकातील अपोलो मेडिकल स्टोअर्ससमोर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी आबड यांच्या गळ्यातील सुमारे ५५ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकर्णा कदम (रा. राजसारथी सोसायटी) या शनिवारी रात्री मुलगा आणि सासू यांच्यासह चंदा हार्डवेअर दुकान परिसरात गेल्या होत्या. काम आटोपून सर्वजण रस्त्याने पायी घराकडे जात असताना वनसंपदा सोसायटी परिसरातील उद्यानाजवळील रोहिणी हाईटस इमारतीसमोरील चौफुलीजवळ एकाच दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने कदम यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपयांची सोन्याची पोत हिसकावून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.